रत्नागिरी (आरकेजी): केरळमधील ‘निपा’ विषाणू आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाला आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयस्तरावर प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना आखण्याच्या सूचना जि.प.आरोग्य विभागाच्यावतीने दिल्या आहेत.
केरळमधील कोझिकोडे येथे ‘निपा’ विषाणू आजाराचा उद्रेक झालेला आहे. आतापर्यंत त्याठिकाणी ९ जणांचा मृत्यू या आजाराने झाल्याचे वृत्त आहे. आजमितीस या आजाराचा महाराष्ट्र राज्याला फारसा धोका नसला तरी या पार्श्वभुमीवर याठिकाणीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. त्यासाठी निपा सदृश्य आजाराचे सर्व स्तरावर सर्वेक्षण होणे तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना आखण्यात याव्यात असे सांगण्यात आले आहे.
या विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणाऱया वटवाघळांच्या मार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव पाणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. निपा विषाणूची लागण माणसापासून माणसाला होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांनाही लागण होऊ शकते. निपा विषाणू आजारात ताप येतो. अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गेंधळ उडणे, बेशुध्द पडणे अशी लक्षणे आढळतात. मृत्यूचे पमाण ४० ते ७० टक्के आहे.
निपा विषाणू आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साह्यभूत शुश्रुषा यावर भर दिला जातो. विषाणूच्या निदानासाठी घसा किंवा नाक स्त्राव, मूत्र, रक्त या नमुन्यांची तपासणी राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, पुणे येथे करण्यात येते. त्यासाठी येथील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱयांनी रुग्ण उपचार आणि शुश्रुषा करताना जागतिक आरोग्य संघटनेच्यानुसार आवश्यक खबरदारी घ्यावी. नागरिकांनी शेतात, जंगलात अथवा इतरत्र पडलेली फळे खाणे टाळावे असेही आवाहन करण्यात आले आहे.