नवी दिल्ली :राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल मैदानावर उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुण्याजवळ खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 134 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला उपस्थित होते.सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर म्हणून हा अतिशय समाधानाचा क्षण असल्याचे यावेळी राष्ट्रपती म्हणाले. सशस्त्र दल हे सर्वोत्कृष्टता आणि देशासाठी समर्पणाचं प्रतीक आहे असे सांगतून ते म्हणाले की संचलनात देशातल्या सर्व भागातील आणि समाजातील कॅडेटस आहेत. यातून समाजातील बहुलतावाद आणि एकता दिसून येते असे ते म्हणाले.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही केवळ एक प्रशिक्षण सुविधा नाही तर शौर्य आणि धाडस यांचा संगम आहे. सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांच्या अनेक पिढ्यांकडे राष्ट्रसेवेची भावना या संस्थेने रुजवल्याचे ते म्हणाले. हे कॅडेटस आज युवकांसाठी आदर्श बनले असून ते यापुढेही उत्तम कामगिरी बजावतील असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण… देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण… आणि येणा-या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेह-यावर झळकणारा आत्मविश्वास… अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३४ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा बुधवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला. यावेळी अकॅडमी कॅडेट अक्षत राज याने सर्व शाखांमध्ये प्रथम येत राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर छात्रसैनिक सोहेल इस्लाम याने सर्व शाखांमध्ये दुसरा येत रौप्य पदकाचा सन्मान मिळविला. अली अहमद चौधरी याने तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक मिळविले. ‘किलो’ स्क्वॉड्रनला ‘चीफ आॅफ स्टाफ बॅनर’ पुरस्कार मिळाला. विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संचलनात एकुण ३४४ कॅडेट सहभागी झाले होते. यातील २३८ छात्र लष्कराचे, २६ छात्र नौदलाचे आणि ८० छात्र हवाईदलातील होते. याशिवाय अफगाणिस्थान, भूतान , किरगीजस्थान, लाओस, नायजेरिया, मालदिव, तजाकीस्थान येथील १५ छात्रांचाही संचलन सोहळ्यात समावेश होता. याप्रसंगी भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा, इंटिग्रेटेड आर्मी स्टाफ चे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीश दुआ, सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, प्रबोधिनीचे प्रमुख एअर मार्शल आय. पी. विपीन, डेप्युटी कमांडन्ट रिअर अॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्रबोधिनीचे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यांच्यासह सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, छात्रसैनिकांचे पालक उपस्थित होते.