
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारुन खान यांनी मुलासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचा व्हायरल झालेला फोटो
मुंबई : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारुन खान यांनी मुलासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा भाजपने केला. मात्र, खान यांनी भाजप प्रवेशाला नकार देत, मुख्यमंत्र्यांची भेट झाली घेतल्याचे सांगत सावरासावर केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
विक्रोळी पार्क साईट, घाटकोपर, पवई येथे हारुन खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड स्थापन केला. २००२ मध्ये त्यांनी पालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. २००५ ते २००७ पर्यंत भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे ईशान्य मुंबईचे ते जिल्हाध्यक्ष होते. २००७ व २०१२ मध्ये ते दोन वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी नगरसेवकपद भूषविले होते. तर खान यांच्या पत्नी ज्योती खान या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक १२४ मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. मंगळवारी हारून खान व त्यांचा मुलगा रोशन खान यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप खासदार किरीट सोमय्या, पालिका गटनेते मनोज कोटक उपस्थित होते. प्रसारमाध्यमांमध्ये प्रवेशाचे फोटो ही प्रसारीत झाले. मात्र, खान यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताला नकार दिला. काही वैयक्तिक कामामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी माझे स्वागत करण्यात आले. खासदार, कोटक तेथे उपस्थित होते, असे खान यांनी सांगितले. तर भाजपने प्रवेश दिल्याचा दावा भाजपचे पालिका गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे. त्यामुळे खान राष्ट्रवादीत की भाजपमध्ये याबाबतचे सांशकता आहे.