नवी दिल्ली : देशभरातल्या इमारतींच्या बांधकामांचे नियमन करण्यासाठी ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड’ (बीआयएस)च्या वतीने नॅशनल बिल्डींग कोड ऑफ इंडिया (एनबीसी) २०१६ अशी सर्वंकष नियमावली तयार केली आहे.
अशा प्रकारची नियमावली १९७० मध्ये सर्वप्रथम प्रकाशित केली होती. त्यानंतर १९८३ मध्ये नियोजन आयोगाने त्यामध्ये सुधारणा केली होती. यानंतर २००५ मध्ये या नियमावलीत दुसऱ्यांदा आणखी सुधारणा करण्यात आल्या. २०१५ मध्ये नियमावलीत दोनदा दुरुस्तीही करण्यात आल्या.
बांधकाम क्षेत्रातील वेगानं होणारे बदल आणि बदललेले कामाचे स्वरुप लक्षात घेऊन नियमावलीत बदल करण्यात येत आहे. बांधकाम साहित्यात झालेले बदल, नवीन तंत्रज्ञान तसंच पर्यावरण संरक्षणासाठी इमारती बांधताना घ्यावयाची काळजी इमारतींच्या नियमनासंबंधी मानक निश्चित करताना जवळपास एक हजार तज्ञांच्या मतांचा विचार केला आहे.
या नियमनामध्ये इमारतीचे प्रशासन, विकासाविषयीचे नियम, अग्निशमन यंत्रणा, बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य अशा विविध घटकांचा विचार करण्यात आला आहे.
भारतीय मानक संस्थेने ही नियमावली दोन खंडात प्रकाशित केली आहे.