पुणे : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्या संगणक सॉफ्टवेअर अभियंता नयना पुजारी यांच्या खून प्रकरणातील तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पुणे सत्र न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू होता. आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांच्या फाशीच्या शिक्षेवर न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी शिक्कामोर्तब करत हा ऐतिहासिक निकाल दिला.
भारतीय दंडविधानाच्या १२० ब (कट करणे), ३६६ (अपहरण) ३७६ (बलात्कार), ३०२ (खून)आदी कलमांखाली आरोपींना दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणी माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीची सुटका करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजुंकडील युक्तिवाद ऐकून घेतले आणि तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली.
या गुन्ह्यातील मास्टर मार्इंड योगेश राऊत हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना १७ सप्टेंबर २०११ रोजी फरार झाला होता. त्यानंतर त्याला २० महिन्यांनंतर पुन्हा अटक करण्यात आली होती.
नयना पुजारी कामावरून घरी जाण्यासाठी रात्रीच्या सुमारास खराडी बायपास येथे उभ्या होत्या. याचवेळी इंडिका कॅब चालक योगेश राऊत याने नयना यांना घरी सोडण्याच्या बहाणा केला आणि निर्जन भागात नेले. तेथे मित्रांसह बलात्कार केला. यानंतर क्रूरपणे खून करुन दगडाने चेहरा ठेचला. आज या नराधमांवरील आरोप सिद्ध होऊन त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्य़ात आली.