मुंबई : येत्या नवीन वर्षात राज्यातील 52 नद्यांचे शुद्धीकरण मोहिमेचे काम सुरु होणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
ते आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.
कदम म्हणाले, अलीकडेच चंद्रभागा नदी स्वच्छ केली. या मोहिमेत जवळपास 500 नागरिक आणि अधिकारी सहभागी झाले होते. लवकरच तेथील गाळ काढणार आहोत. चंद्रभागेत आजूबाजूच्या 121 गावांचे सांडपाणी सोडले जाते. ते अडवणार आहोत. त्यासाठी 20 कोटी रुपये दिले आहेत. नदी काठी भक्तांसाठी स्वच्छतागृहे, अंघोळीसाठी घाट बांधणार आहोत.
कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासंदर्भात श्री. कदम म्हणाले, राज्यातील 227 नगरपरिषदा आणि 27 महानगर पालिका क्षेत्रातील कचरा आणि शेण एकत्र करुन सेंद्रीय खत निर्माण करणार आहोत. हे खत शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना रासायनिकयुक्त धान्यापासून मुक्ती मिळेल.
प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर भीमा, गोदावरी, पंचगंगा, उल्हास, मीठी या व इतर जवळपास 52 नद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम पर्यावरण विभागाने हाती घेतली आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
प्रधान सचिव अनिल डिग्गीकर म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने जगभर प्रलयकारी घटना घडत आहेत. तापमान वाढ, सुनामी, महापूर ही उदाहरणे आहेत. राज्यात सुरु असलेल्या प्लॅास्टिक बंदीला 90 टक्के प्रतिसाद मिळाला असून पुढच्या सहा महिन्यात संपूर्ण प्लास्टिक बंदी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन यांचीही भाषणे झाली.
या कार्यक्रमात कदम यांच्या हस्ते इकोफ्रेंडली घरगुती गणपती स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश गुणे यांनी केले. शेवटी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी आभार मानले