मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी (ता़. ३०) जाहीर झाला. यावर्षी राज्यातील ९ विभागीय मंडळामध्ये कोकण मंडळाचा सर्वाधिक ९४.८५ टक्के निकाल लागला. कोकण मंडळाने सलग ७ व्या वर्षी राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे़. या मंडळात यावर्षीदेखील मुलांच्या तुलनेने मुलींनी बाजी मारली आहे़ . मुंबई सेंट्रल येथील नवनीत जुनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून मानसी सराटा हिने ९६.१५ टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केले. याच कॉलेजच्या ऋषिल संघगवीला ९१.३८ तर अतहर बेग याला ८८ टक्के मिळाले.
अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सराव चाचण्या यांमुळे यश मिळाल्याचे मानसी हिने सांगितले. कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी यांनी घेतलेल्या मेहनतीमूळे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया नवनीत जुनिअर कॉलेजचे प्राचार्य कमलेश मिश्रा यांनी दिली.