
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): दुर्गम भागातील एका महिलेने शासकीय रुग्णवाहिकेतच तिळ्यांना जन्म दिला होता. कोल्हापूर येथील रुग्णालयात या तिळ्यांवर उपचार सुरू होते. मात्र रविवारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संगमेश्वर तालुक्यातील दख्खन या दुर्गम भागात राहात असलेल्या गर्भवती प्रणाली जाधव यांना ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दवाखान्यात आणलं जात होतं. मात्र साखरपा आरोग्य केंद्रात उपचार न झाल्याने त्यांना पाली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र तिथेही डॉक्टर उपलब्ध न झाल्याने त्यांना १०८ या शासकीय रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणलं जात होतं. याच दरम्यान प्रणाली हिने रुग्णवाहिकेत तीन मुलांना जन्म दिला. मात्र या तिन्ही मुलांचं वजन अतिशय कमी होतं. तिघांचं वजन अनुक्रमे ९०० ग्रॅम, ८०० ग्रॅम आणि ७५० ग्रॅम होतं. त्यामुळे अधिक उपचारासाठी या तिन्ही मुलांना कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचार सुरु असताना या तिघांचाहि दुर्दैवी मृत्यू झाला.

















