नवी मुंबई : “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ” ला सामोरे जाताना “माझा कचरा – माझी जबाबदारी” हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रीय सहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. याचीच परिणिती म्हणून “स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ” मध्ये आज नवी दिल्ली येथे केंद्र सरकारमार्फत नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहर म्हणून घोषित कऱण्यात आले. “स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ” मध्ये मध्ये इंदौर, भोपाळ व चंदीगढ या तीन शहरांना देशातील सर्वात स्वच्छ शहरांचा अनुक्रमे बहुमान मिळाला. तसेच इतर शहरांना स्वच्छतेच्या विविध क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या मोठ्या महानगरांमध्ये देशात सर्वोत्तम असल्याचे घोषित करण्यात आले.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. महापौर जयवंत सुतार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी तसेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासह सर्व अधिकारी – कर्मचारीवृंदाने स्वच्छ सर्वेक्षणाचे काम झोकून देऊन केले होते. नवी मुंबईकर नागरिकांचाही सक्रीय सहभाग स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये तसेच वैयक्तिक पातळीवर लाभला होता. दररोज घरात निर्माण होणा-या कच-याचे ओला व सुका असे घरातच वर्गीकरण करून कचरा गाड्यांमध्येही तो वेगवेगळा देण्याचे प्रमाण नवी मुंबईत ८५ टक्के इतके गाठण्यात यश लाभले असून हे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. हा वर्गीकृत साधारणत: ७५० मेट्रीक टन कचरा दररोज नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणशील शास्त्रोक्त भू-भरणा पध्दतीवर आधारीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी योग्य प्रकारे वाहून नेला जात असून त्यावर प्रक्रिया केली जात आहे.त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात नवी मुंबई देशात सर्वोत्तम असल्याचा निर्णय हा नवी मुंबईकर नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा असून याचे संपूर्ण श्रेय हे नवी मुंबईकर नागरिकांचे असल्याचे मत महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केले असून स्वच्छता सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्वच्छतेची लागलेली सवय ही कायमस्वरुपी रहावी वआपले स्वच्छतेतील स्थान कायम उंचावत रहावे यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक व सक्रीय रहावे असे आवाहन केले आहे.