
gavel
रत्नागिरी, (आरेकजी) : आजोबांची हत्या करणार्या चुलत नातवाला रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून देवेंद्र राऊत असे त्याचे नाव आहे. राजापूर तालुक्यातल्या पाटवाडी- आंगले येथील तो रहिवासी आहे. सामाईक जमिनीच्या वादातून त्याने चुलत आजोबा अनाजी भानुराव राऊत(७०) यांची हत्या गेल्या वर्षी मे महिन्यात करण्यात आली होती.
राजापूर तालुक्यातल्या पाटवाडी येथे राऊत कुटुंब एकाच घरात एकत्रित राहत होते. चुलत आजोबा, चुलत नातू, पुतण्या हे एकाच घरात राहत होते. मात्र या कुटुंबात सामाईक जागा जमिनीवरून वाद सुरू होते. याबाबत राजापूर दिवाणी न्यायालयात खटला देखील सुरु आहे. पण याच वादातून देवेंद्र राऊत याने ७ मे २०१६ रोजी अनाजी यांच्या डोक्यात पहारने प्रहार करून त्यांचा खून केला. पोलिसांनी त्याच दिवशी देवेंद्र याला अटक केली होती. या खटल्याचा निकाल लागला. खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी आरोपीला खून केल्याप्रकरणी जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व तो न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.