मुंबई, विशेष प्रतिनिधी:- मुंबईच्या महापौर श्रीमती किशोर किशोर पेडणेकर यांना इंदौर (मध्यप्रदेश) येथील वैकल्पिक चिकित्सा पद्धती विकास संस्था आणि वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डस् यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रप्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाज सेवेमध्ये दिलेल्या अतुलनिय योगदानासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
वैकल्पिक चिकित्सा पद्धती विकास संस्था आणि वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डस् यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आत्मनिर्भर भारत राष्ट्रीय परिषद – २०२० चे आयोजन इंदौर येथे करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या देशभरातील निवडक मान्यवरांना राष्ट्रप्रेरणा पुरस्कार – २०२० घोषित करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांना उल्लेखनीय वैयक्तिक कामगिरी, राष्ट्रीय कार्यामध्ये अतुलनिय योगदान आणि सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रप्रेरणा यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
महापौर पेडणेकर यांनी कोरोना विषाणू संसर्ग कालावधीमध्ये सातत्याने प्रशासनाचे पाठबळ उंचावत तसेच सर्व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधून आरोग्य उपाययोजनांमध्ये झोकून दिले. कोविडबाधा झाल्यानंतर त्यातून सावरताच पुनश्च हिरीरीने व तितक्याच तडफदार पद्धतीने त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन जनहिताची कामे केली. पूर्वाश्रमीच्या परिचारिका म्हणून गाठीशी असलेला अनुभव व राजकीय कारकीर्दीतून प्राप्त प्रशासकीय कौशल्य यांचा उत्तम मेळ साधून त्यांनी आपला ठसा उमटविला. त्यांच्या या कामगिरीची दखल देशभरातील माध्यमांनीदेखील घेतली आहे. राष्ट्रप्रेरणा पुरस्कार प्रदान करताना महापौरांच्या या संपूर्ण कार्याची स्तुती देखील आयोजकांनी केली आहे. सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध स्तरातून महापौरांचे अभिनंदन करण्यात येत आहे.