मुंबई, (निसार अली) : नारळी पौर्णिमा आज सागरी किनारपट्टीवर कोळी समाजाने उत्साहात साजरी केली. पारंपरिक वेशात समुद्राला नारळ अर्पण करून सजविलेल्या नौका समुदात मासेमारीसाठी सोडण्यात आल्या.
समुद्र शांत रहावा यासाठी कोळी समाजाकडून पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा केली जाते. पूजेसाठी नारळ अर्पण केला जातो.
मुंबईत कुलाबा, वरळी, माहीम, धारावी, शीव, माहुल, मुलुंड, जुहू, वेसावे, मढ, मालवणी, गोराई आदी ठिकाणी कोळीवाडे आहेत. येथेही नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
नारळ पौर्णिमेनिमित्त नौकांना सजविण्यात आले. नौकांवर रंगरंगोटी करून सजवण्यात आले होते. कोळीवाड्यातून वाजत गाजत कोळी गीतांच्या साथीने मिरवणुका काढण्यात आल्या.
वेसावे येथील बूधागल्लीतील कोळी समाजाने आज मोठ्या उत्साहात नारळीपौर्णिमा साजरी केली. यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली आणि समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. यानंतर सुमारे दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मासेमारी नौका समुद्रात उतरवण्यात आल्या आणि आजपासून मच्छीमारीला सुरुवात करण्यात आली. निसर्ग साथ देईल आणि हा हंगाम चांगला जाईल, असे साकडे मच्छीमारांनी समुद्राला घातले. यावेळी कोळी समाजातील राजा लाकडे, प्रदीप आड़ी, वृदांवन जिंगाने तसेच महिला उपस्थित होत्या.