मुंबई : काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. रविवारी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत घोषणा केली. लवकरच पक्षाची नोंदणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सुरुवातीपासून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
सिंधुदुर्गमधील काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर काँग्रेसला राणेंनी रामराम ठोकला. यानंतर भाजपच्या वाटेवर जाणार अशी चर्चा सुरू झाली. दिल्लीला जाऊन भाजप पक्षश्रेष्ठी अमित शहा यांचीही राणेंनी भेट घेतली. यावेळी राणेंना नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिल्याचे समजते. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे पंतप्रधानांवर टीका करतात, मात्र त्यांचं राज्यासाठी-देशासाठी योगदान काय असा खडा सवालच राणेंनी विचारला आहे. शिवसेना सत्तेतून कधीच बाहेर पडणार नाही, शिवसेनेला जर हाकललं तरच शिवसेना सत्तेतून जाईल असं म्हणत राणेंनी शिनसेनेवर निशाणा साधला. यावेळी अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे सोडून बाकी सगळेजण आपले मित्र असल्याचे राणे म्हणाले.
नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कर्जमाफी बुलेट ट्रेनला देशात विरोध होत असताना राणेंनी मात्र यावेळी सावध भूमिका घेत, भाजपची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.
बोलवंण आल्यास एनडीए मध्ये जाणार
एनडीएतील सहभागाबाबत राणेंनी उघडपणे बोलणे टाळले. एकदा पक्ष स्थापन होऊ द्या, मग बोलावणं आल्यास आम्ही एनडीएत जाऊ असे राणेंनी स्पष्ट केले.
नितेश राणे नव्या पक्षात कधी?
नितेश राणे सध्या काँग्रेस आमदार आहेत, ते राणेंच्या नव्या पक्षात कधी दाखल होतील यावर उघडपणे बोलणं, नारायण राणेंनी टाळलं. नितेश राणे यांनी साहेब देतील तो आदेश मान्य असेल असं नुकतंच म्हटलं होतं.