
रत्नागिरी : या 5 वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सरकारसह शिवसेना, उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांच्यावर चौफेर टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे जाहीर सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी राणे म्हणाले की आमचा पक्ष कोकणासाठी जन्म घेतलेला पक्ष आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय. सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता आमचाच विजय होईल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही जे काही बोलू, सांगू ते सत्यच सांगू. 5 वर्ष तुम्ही खासदार आहात, सत्तेत आहात मग छातीठोकपणे सांगा एखादा प्रकल्प आणलात, किती लोकांना बेरोजगार दिलात असा सवाल त्यांनी यावेळी राऊत यांना केला.
या 5 वर्षात महागाई कमी झाली का? गॅस, पेट्रोल, डिझेल, कपडे स्वस्त झाले का?महागाई वाढली त्याला जबाबदार कोण विचारा त्या विनायक राऊतला. साडेतीन कोटी बेकार झाले, 15 लाख अकाउंटवर देऊ शकले नाहीत. 2 कोटी नोकऱ्या दिल्या का? अच्छे दिन येणार सांगितलेत मग कुठे आहेत अच्छे दिन. या सरकारने लोकांना जगणं मुश्किल करून टाकलं असल्याची टीका यावेळी राणेंनी केली.
रत्नागिरी आमदार, जिल्हापरिषद, पंचायत समित्या शिवसेनेकडे आहे, मग विकास झाला का? रत्नागिरीतले दारू मटका जुगार हे धंदे कुणाचे शिवसेनेचे. ही शिवसेना नाही, लुटसेना असल्याची टीका यावेळी राणेंवर केली.
उद्धव ठाकरेंवर टीका
मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेना होती, मग मुंबईतून मराठी माणूस हद्दपार का झाला?
वडिलांचं अजून स्मारक बांधलं नाही आणि राम मंदिर बांधायला चालला आहे. काँग्रेसच्या राजवटीत मी मंत्री होतो, त्यावेळी आम्ही मुस्लिमांनाही आरक्षण दिल, मात्र हे पांढऱ्या पायाचे सत्तेवर आले यांनी आम्ही मुस्लिमाना दिलेलं 5 टक्के आरक्षण काढून घेतलं. मराठ्याना आरक्षण मिळाव असं शिवसेनेला वाटत नव्हतं. कोकणात जे काही विकासाच्या गोष्टी झाल्या त्या मी आणल्या, या उद्धव ठाकरेंनी काय दिलं. नाणार आणला कोणी शिवसेनेने. आणि आता उद्धवच म्हणतो मी नाणार घालवला. उद्धव काहीही करू शकत नाही. नारायण राणे सारखे शिवसैनिक शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना वेगळी होती आणि आताची शिवसेना वेगळी आहे, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली.
विनायक राऊतांवर टीका
बाळासाहेबांनी मला एवढी पदं दिली, शाखाप्रमुखपासून मुख्यमंत्री पदापर्यंत पद दिली, शेंबड्या तुला दिली का? इथल्या पुढाऱ्यांच्या आशीर्वादानेच एलईडी फिशिंग होतेय. या खासदाराने संसदेत कोकणाचं हसं केलं. धड हिंदी बोलता येत नाही.
पोलिसांनी पक्षपात करू नये – राणे
निलेशच्या वाट्याला कोणी जाऊ नका त्याच्या वडिलांचं नाव नारायण राणे आहे.पोलिसांनी पक्षपात करू नये. कायदा सर्वांना सारखा आहे.कोणी आम्हाला कायदा शिकवू नये.असे राणे यावेळी म्हणाले
शिवसेनेचं सर्व सैन्य निलेश राणेला बाद करायला निघालं आहे : निलेश राणे
यावेळी निलेश म्हणाले कुठेतरी निलेश राणे अडकला पाहिजे, कुठेतरी हा उमेदवार बाद झाला पाहिजे यासाठी शिवसेनेचे सर्व प्रयत्न सुरू आहे. स्पर्धेमध्ये टिकू द्यायचं नाही. त्यांचं सर्व सैन्य लागलेलं निलेश राणेला बाद करायला. पण 2019 मध्ये आमदार उदय सामंतला बाद करणार अशी टीका निलेश राणे यांनी यावेळी केली. दरम्यान आम्ही आमच्या सभेला लोकांना खेचून आणत नाही, तुम्हाला लोकं खेचून का आणावी लागत आहेत. 15 वर्ष मतदारसंघात एक काम दाखविण्यासारख दाखवा. आज विनायक राऊत मातोश्रीला हप्ते देतो, म्हणून राऊत मातोश्रीच्या जवळ आहे. विनायक राऊत मातोश्रीच्या जवळ आहे आणि म्हणून सामंतने राऊतला जवळ केलं आहे. अशी टीका निलेश राणे यांनी यांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांच्यावर यावेळी केली.
हे कार्यकर्त्याना मोठं होऊ देत नाहीत. आज यांचे कार्यकर्ते जेलमध्ये आहेत पण त्यांना बाहेर काढायला यांना वेळ नाही.
तुमची 5 वर्ष खासदारकीची आणि माझी 5 वर्ष खासदारकीची एकाच व्यासपीठावर इंग्लिशमध्ये चर्चा करा, असं खुलं आव्हान देतो.. असं निलेश राणे यावेळी राऊतांना उद्देशून म्हणाले.
शिवसेना एकट्या बाळासाहेब ठाकरेंमुळे वाढली नाही, नारायण राणेंसारख्या लोकांमुळे शिवसेना वाढली.
शिवसेनेचा सर्वात मोठा काटा निलेश राणे झालाय कारण त्यांना भीती आहे निलेश राणे निवडून आला तर आपले सर्व धंदे बंद पडतील असं निलेश राणे यावेळी म्हणाले.
















