रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प कोकणात कुठेही होऊ देणार नाही, जर हा प्रकल्प पुन्हा कोकणात आणण्याचा प्रयत्न झालाच तर आम्ही त्याला विरोधच करू असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.
नाणार रिफायनरी प्रप्रकल्पासाठी परवानग्या शिवसेनेच्याच मंत्र्यांनी दिल्या. जमीन संपादनासाठी त्यांच्याच मंत्र्यांनी परवानगी दिली. हा प्रकल्प कोकणात यावा अशी मागणी शिवसेनेच्याच अनंत गीते, विनायक राऊत यांनी केली होती. प्रकल्प आणलाही, मात्र आम्ही सुरुवातीपासून विरोध केला. जनता आमच्यासोबत होती. हे सर्व शिवसेनेने पाहिलं, आणि आता काही आपलं खरं नाही असं त्यांना वाटलं, मग त्यांनी कोलांटीउडी मारली, अशी टीका राणे यांनी यावेळी केली. तसेच कोकणात जर कुठेही हा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही त्याला विरोधच करू असा इशारा राणे यावेळी दिला.
भाजपशी शिवसेनेने युती करायला कारण म्हणजे शिवसेनेला सत्ता हवी आहे आणि ती पैशासाठी हवी असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी यावेळी केला. युती करण्याचे हे एकमेव कारण असल्याचं सांगत नारायण राणे यांनी सेनेवर हल्लाबोल केला. स्वार्थासाठी शिवसेनेने भाजपसमोर शरणागती पत्करली अशीही टीका नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.