रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांना आरक्षणातले काय कळते, अशी खिल्ली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी उडविली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची चिपळूण येथे जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा आज झाली.
खासदार झाल्यानंतर नारायण राणे प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसात ते रत्नागिरी जिल्ह्यात दोन जाहीर सभा घेत आहेत. पहिली सभा आज चिपळूण शहरात झाली.
राणे यांच्या बरोबर त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बॅनरखाली झालेल्या या सभेत नारायण राणे यांनी कोकणी माणसाने आता शिवसेनेची साथ सोडावी असा आवाहन केले. शिवसेना नेत्यांना आणि नेतृत्वाला केवळ पैशाची भाषा कळते, असा आरोप त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत स्वाभिमान पक्षाच्या चिपळूण इथल्या जाहीर सभेत बोलताना खासदार नारायण राणे यांनी मराठा समाजाची स्थिती सांगितली. राज्यात 34 टक्के समाज आहे. 20 टक्के समाज गरिबीत आहे.
सत्तेत असूनही शिवसेनेला मुख्यमंत्री याना भेटत नाहीत, हे काय कामाचे? असा प्रश्न त्यांनी केला. महाराष्ट्र पेटलाय, जाळपोळ होतेय हे बंद व्हायला पाहिजे या भावनेतून मुख्यमंत्र्याना मी तीनदा भेटलो. उद्धव ठाकरे यांना आरक्षणातलं काय कळतं. यांना फक्त टक्केवारीतलं कळते अशी टीका राणे त्यांनी केली.