रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : तुमचे प्रश्न सोडवणे हा माझा धर्मच आहे, ते मी सोडवणारच परंतु तुम्हीही संघटित व्हा, एकत्र या, नव्या तंत्रज्ञानाची कास धरत परदेशात आंबा पाठवण्यापेक्षा परदेशी व्यापा-यांना तुमच्यापर्यंत येऊ द्या, यासाठीही मी तुम्हाला मदत करेन असे खंबीर आश्वासन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीतील आंबा बागायतदारांच्या जिल्हा मेळाव्यात दिले.
हवामानात सातत्याने होणारे बदल, ऋतुमानातील विषमता, अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, सहन न होणारा उष्मा, जोरदार वारे या आस्मानी संकटासोबतच बँकांकडून होणारी पिळवणूक, कृषी विभागाची मनमानी यामुळे हैराण झालेल्या आंबा बागायतदारांनी नारायण राणे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. यासाठी रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार संघटना आणि पावस परिसर रत्नागिरी हापूस आंबा बागायतदार सहकारी संस्था यांचा संयुक्त मेळावा मराठा मैदानावर पार पडला. यावेळी राणे यांनी बागायतदारांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी निवेदनाद्वारे दिलेल्या १७ मागण्यांबाबत बोलताना राणे म्हणाले की, हे सर्व प्रश्न मी तुम्हाला सोडवून देतो, त्यातील विमा कंपन्या, बँका आणि कृषी अधिका-यांशी बोलतो. इथल्या बागायतदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यासमोर बसतो, त्यांनीच काढलेल्या जीआर त्यांच्यासमोर ठेवतो आणि तुमचे प्रश्न मांडतो. हे सारे प्रश्न सुटणारे आहेत. आजपर्यंत ते इथल्या आमदार, खासदारांनी का सोडवले नाहीत असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी आंबा बागायतदारांनी संघटित होणे गरजेचे आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राणे म्हणाले आंबा फळांचा राजा परंतु उस, कापूस, सोयाबीन यापासून ते परदेशी फळांमध्येही आंबा मार्केटिंगमुळे मागे पडला आहे. यासाठी इथल्या शेतक-यांनी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे, मार्केटिंगचे तंत्र अवलंबिले पाहिजे. केवळ आंबाच नाही, मच्छीच्या निर्यातीतीही आपण कमी पडतोय, आपली बदनामी होतेय, कष्ट, मेहनत घेऊनही मोबदला कमी मिळतोय. यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, निर्यातदार तुमच्याकडे आले पाहिजेत, येथेच आंबा साठविण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरीत प्रक्रिया उद्योग निर्माण करणे आवश्यक असून त्यासाठी मी मदत करण्यास तयार आहे असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेरकर,पावस आंबा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, रत्नागिरी जिल्हा आंबा व्यावसायिक संघटनेचे सरचिटणीस तुकाराम घवाळी, लाईक शेठ फोंडू यावेळी उपस्थित होते. आंबा बागायतदांना एकत्रित येण्याचे आवाहन करताना माजी खासदार निलेश राणे आपल्या भाषणात म्हणाले की आपला आंब्याला जगात मागणी आहे. परंतु, आपल्याकडे साठवणूक क्षमता नसल्याने आपलं सोनं आपण कच-याच्या भावाने विकतो आहोत. त्यामुळेच दुसरी माणसे आपल्या जीवावर मोठे होत आहेत. यासाठी तुम्ही संघटित व्हा, कुणालाही घाबरू नका, तुमच्या मागे आता राणे आहेत. आपण आपला आंबा जगाला दाखवू असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रस्तावनेमध्ये तुकाराम घवाळी यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या मांडल्या. प्रकाश साळवी, राजेंद्र कदम, लाईकशेठ फोंडू यांनीही आपल्या समस्या या मेळाव्यात मांडल्या. दोन्ही संघटनांतर्फे राणे आणि निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.
3 Attachments