रत्नागिरी (आरकेजी) : राजापूर तालुक्यातील नाणार दशक्रोशीतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेहि दंड थोपटले आहेत. आणि याचसंदर्भात आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची आज आज राजापूर तालुक्यातील सागवे (कात्रादेवी) इथे सभा होणार आहे. सायंकाळी ४ वाजता या सभेला सुरुवात होणार आहे.
नाणार परिसरातील १४ गावामध्ये उभरण्यात येणारा विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा निर्धार करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे. या प्रकल्पाच्या विरोधाचा जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत हा विश्वास देण्यासाठी आज (८ फेब्रुवारी) माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची जाहीर सभा नाणार येथे होणार आहे. दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या सभेत राणेंवर जोरदार टीका केली होती. मंत्रिपद अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्यामुळेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन करणारे नारायण राणे आता रिफायणरीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मंत्रिपद मिळालं कि त्यांचा विरोध आपोआप मावळेल अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यामुळे या टीकेचाहि समचार घेत शिवसेनेवर नारायण राणे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.