मुंबई : समाजाने कसे वागावे याची शिकवण देणाऱ्या पत्रकारांनी आपल्या वागण्या, बोलण्याचे आणि लिखाणाचेही सिंहावलोकन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबईच्यावतीने महर्षी नारद जयंतीनिमित्त नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विश्व संवाद केंद्र, मुंबई तर्फे नारद जयंतीच्या औचित्याने दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार यावर्षी रमेश पतंगे (सा.विवेक) आणि भालचंद्र दिवाडकर (दै. सागर) या दोघांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून तर शुभांगी खापरे (दै. इंडियन एक्सप्रेस) व अतुल जोशी (दै. सामना) यांना पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून श्रीराम वेर्णेकर (दै. टाईम्स ऑफ इंडिया) आणि सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून ज्योती अंबेकर (दूरदर्शन वाहिनी) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकारांनी आपले वर्तन पारदर्शी ठेवत नैतिकतेचा मानदंड निर्माण करावा. समाजात सकारात्मक वृत्ती रुजवण्यासाठी पत्रकारांनी आपल्या आजूबाजूला जे काही चांगले घडत आहे, त्याचे प्रामुख्याने वार्तांकन केले पाहिजे. आमचा वाचक, प्रेक्षकवर्ग कमी होईल, अशी भीती बाळगू नका, आजही सकारात्मक बातम्यांना प्रेक्षकवर्ग आहे, असे त्यांनी नमूद केले. एखादा शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि न्यायाधीशाच्या निष्पक्षपाती भूमिकेतून पत्रकारिता होणे अपेक्षित आहे. तिला सामाजिक जबाबदारी असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आपल्या उद्भोधनपर भाषणाची सुरुवात करताना त्यांनी आद्य पत्रकार नारद जयंती कार्यक्रम व पुरस्काराच्या परंपरेची पायाभरणी केल्याबद्दल विश्व संवाद केंद्राचे अभिनंदन केले. जेव्हा नारद पुरस्कार देणे सुरू झाले, तेव्हा त्याच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, त्याची चेष्टाही करण्यात आली. मात्र आता हा सन्मान प्रतिष्ठेचा बनला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आवश्यक माहिती जमा करणे आणि लोकहितासाठी त्याचे प्रसारण करण्याचे काम नारदांनी केले. आपल्याकडील चित्रपट किंवा मालिकांमधून नारदांची प्रतिमा उपहासात्मक पद्धतीने मांडण्यात आली. आपल्याच इतिहासातील एका महान व्यक्तिमत्वाला थट्टेचा विषय बनवले गेले. नारद हे जगातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व असून त्याचे अनुकरण करत त्यांना आदर्श मानून प्रेरणेने काम करणे पत्रकारांसाठी महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वृत्त, विचार आणि प्रचार ही पत्रकारितेची तीन अंगे आहेत. समोरच्या व्यक्तीकडून सतत काहीतरी नवीन जाणून घेण्याची इच्छा निर्माण करणे व समोरच्याचे समाधान होईपर्यंत माहिती देणे, असे माध्यमांचे आव्हानात्मक काम असल्याचे मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकारिता हे एक सामाजिक जबाबदारी आहे. पत्रकारितेत केवळ राजकारणासंदर्भातील माहिती प्रसिद्ध होत नसून नैसर्गिक आपत्ती, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्र, मानवी जीवनाशी संबंधित सकारात्मक माहितीही प्रसिद्ध होत असते. अनेकदा माध्यमांकडून बातम्या ‘बनवल्या’ जातात, अर्थाचा अनर्थ केला जातो, असा टोलाही लगावत एखाद्या बातमीच्या मुळाशी न जाता उथळपणे बातमी देण्याचे प्रमाण वाढत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळेच पत्रकारितेत नैतिकतेची साधना करणे महत्वाचे असून शाश्वत सत्य व व्यवहार आदींना डोळ्यापुढे ठेवून पत्रकारिता करायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशाच्या सीमेवर लढताना जवानांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे पत्रकारितेतही अनेकदा पत्रकारांना विविध संकटांना सामोरे जावे लागत असते. आज देशासमोरही अनेक आव्हाने आहेत. देशात अनेक नकारात्मक बाजू आहेत. देशाच्या विकासात माध्यमांचे योगदानही महत्वाचे आहे. याचे भान ठेवून माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.