रत्नागिरी, (आरकेजी) : नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलन पेटले आहे. येत्या अधिवेशनामध्ये हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाली नाही, आणि त्यानंतर जर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकल्पाचे भूमिपूजन करायला आले, तर त्यांच्यासमोर आत्महत्या करेन, असा इशारा कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिला. आज घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
राजापूरमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या विरोधात राजापूरमधील 53 गावं एकत्रित आली असून या मोठा लढा उभारला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपण प्रकल्पग्रस्ताच्या बाजूने असल्याचं सांगत हिवाळी अधिवेशनात आपले मंत्री, आमदार हा मुद्दा मांडतील. आणि रिफायनरी संदर्भातील अध्यादेश मागे घेण्यासाठी दबाव टाकतील असं आश्वासन आंदोलकांना दिलं आहे. मात्र तरी सुद्धा हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सरकारने कोणतीच पावले उचलली नाहीत तर आमरण उपोषण करणार असल्याचं अशोक वालम यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची चर्चा आहे, आणि असं जर असेल तर आपण पंतप्रधानां समोर आत्महत्या करू, असा इशारा वालम यांनी यावेळी दिला आहे.