
रत्नागिरी । अधिसूचना रद्द झालेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे संतापलेल्या रिफायनरी विरोधकांकडून राजापूरमधल्या दत्तवाडी इथं मुख्यमंत्र्यांचा बुधवारी सायंकाळी जोरदार निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील घोषणांमुळे परिसरातील वातावरण दुमदुमून गेलं होतं. मोठ्या संख्येने रिफायनरी विरोधातील लोकं यावेळी उपस्थित होती.
बुधवारी संध्याकाळी दत्तवाडी येथे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा ग्रामस्थांचा रिफायनरी विरोधातील रोष दिसून आला. स्थानिक जनता व समस्त कोकणवासीयांच्या भावनांचा मुख्यमंत्र्यांनी सपशेल अनादर केला. दोन वर्षे सातत्याने केलेल्या संघर्षाला त्यांनी काही तुटपुंज्या लोकांच्या बॅनर बाजीसमोर कमी लेखले. हा आम्हा कोकणी जनतेचा अपमान आहे असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या रिफायनरी संदर्भातील वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून रिफायनरी नाणार परिसरातच काय कोकणात कुठेच येऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.














