रत्नागिरी (आरकेजी): नाणार प्रकल्प लादून कोकणावर अन्याय करणाऱ्याची राख करु असा सणसणीत इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत दिला. तसेच नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करून, शिवसेनेने आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी अशी अपेक्षा नाणारवासियांची व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेने हि अधिसूचना रद्द करत प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी आपण ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले.
नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने, प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे नाणारमधल्या सभेत या पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष होतं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बोलताना महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्यांसोबत भाजपा पक्षावर जोरदार हल्ला चढवला. तसेच इथल्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी विकू नका लॅण्ड माफियापासून सावध रहा अशी शपथ इथल्या प्रकल्पग्रस्तांकडून उद्धव ठाकरेंनी यावेळी घेतली. कोकणाची राख रांगोळी करून गुजरातमध्ये रांगोळी घालायची असेल तर आम्ही होवू देणार नाही अशी भुमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. नाणार प्रकल्प आम्हाला नको हा प्रकल्प खुशाल गुजरातमध्ये किंवा नागपूरला घेवून जा आम्ही त्याचं स्वागत करु असं ही ठाकरे यांनी स्पष्ट केलं. हा प्रकल्प आता रद्द केलाच आहे पण सरकराने जनतेच्या भावनाचा विचार केला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देवू, मोजणी करणाऱ्यांना शिवसेना अडवणार अशी रोखठोक भुमिका जाहिर सभेतून ठाकरे यांनी मांडली. आज आम्ही शांततेच्या मार्गांनी चाललो आहे, पण या मार्गांनी कळत नसेल तर आम्ही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल असं त्यांनी सांगितले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
प्रकल्प लादण्याचे पाप मोदींचेच : ठाकरे
नाणार प्रकल्प शिवसेनेने आणल्याचा अपप्रचार काही लोक करत आहेत, मात्र सौदी अरेबियाशी करार केल्यानंतर हा प्रकल्प कोणी आणला हे स्पष्ट झाले आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्या व्हीलननेच सौदीचा बोळा कोंबला, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. काही लोक शिवसेनेविषयी गैरसमज पसरवत आहेत, मात्र खरे तर हा प्रकल्प भाजपने आणला हे आता उघड झाले आहे, असे ठाकरे म्हणाले.