रत्नागिरी (आरकेजी) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इथे येणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधातला आवाज दडपण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मच्छिमारांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संघर्ष समितीच्या अध्यक्षांना थेट धमकीचं निनावी पत्र आले असून त्यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात जगातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. नाणार पंचक्रोशीतल्या १४ गावातील १३ हजार ६०० एकरवर ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभा राहणार आहे. सुरुवातीला संघर्ष समित्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला स्थानिकांनी मोठा विरोध, आंदोलनही केलं. मात्र प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांनी नियोजीत प्रकल्पाच्या बदल्यात काही मागण्या व मुद्दे शासनासमोर ठेवले होते. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे रिफायनरीचा विरोध थंडावल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र या पंचक्रोशीतील स्थानिक आणि मच्छिमारांनी या प्रकल्पाविरोधात स्वतंत्र लढा उभारण्याचं ठरवलं आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा नव्या संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. उद्योजक अशोक वालम हे या संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पुन्हा या रिफायनरी विरोधातला आवाज बुलंद झाला आहे. मात्र याच वालम यांना आता धमकीचं निनावी पत्र आलं आहे.
अशोक वालम यांच्यासह कुटुंबाला संपवण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. ‘रिफायनरी विरोधातली नाटकं बंद करा, त्यातच तुमच्या कुटुंबाचं भलं आहे.’ अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. दरम्यान या पत्रात एक मोबाईल नंबरही देण्यात आला आहे. या मोबाईल नंबरवर फोन करून व्यवहार करून घ्या, असंही या पत्रातून बजावण्यात आलं आहे.
हे पत्र मिळताच अशोक वालम यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन, अंधेरी पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वालम यांनी दिली आहे. दरम्यान या पत्राला न झुगारता आता प्रकल्पाविरोधतला लढा तिव्र केला जाणार असल्याचं वालम यांनी स्पष्ट केलं आहे.