रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): प्रस्तावित नाणार रिफायनरीच्या जमीन खरेदीबाबत खासदार विनायक राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. जे कोणी लँड माफिया आहेत, ते त्यांनी सिद्ध करावे असं आव्हान भाजपचे नेते आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी खासदार राऊत यांनी केले आहे. रत्नागिरीत शिक्षणाच्या वारी कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणार रिफायनरी प्रकल्पाचा घाट सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत केला होता. यावरून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाणार कोणी जमिनी खरेदी केल्या आहेत ते काढावेत, त्यांचे सातबारे काढावेत, सातबारा माफिया काय आहेत ते दाखवावेत, बिनबुडाचं बोलणं खासदारांना शोभत नाही. आणि जे कोणी लँड माफिया आहेत ते खासदारांनी सिद्ध करावं, आणि ते सिद्ध झालं तर आपोआप त्यांच्यावर कारवाई होईल. खासदरासारख्या जवाबदार व्यक्तीने लोकप्रीय पेक्षा वास्तव विधान केलं तर लोक ते अधिक सिरियसली घेतात, असा टोलाही तावडे यांनी यावेळी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी लगावला.