रत्नागिरी :आशिय़ा खंडातील सर्वात मोठ्या प्रस्तावित आईल रिफायनरी विरोधात आज पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला होता. भूमीकन्या एकता मंचने आज राजापूर तहसील कार्यालयावर या रिफायनरी विरोधात धडक मोर्चाची हाक दिली होती. हजारो प्रकल्पग्रस्त या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष करून महिला वर्गाचा मोठा सहभाग या मोर्चात होता. तसेच काही राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र शिवसेना या मोर्चापासून लांब असलेली पाहायला मिळाली. नाणार रिफायनरी विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठी राजापूरमध्ये आज भूमीकन्या एकता मंचच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. राजापूर शहरातील राजीव गांधी मैदानातून सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीला पोवाड्याच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडण्यात आली. त्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली. या जवळपास 5 हजारांहून अधिक ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते. पक्षविरहित हा मोर्चा होता. या मोर्चातील घोषणांनी संपूर्ण राजापूर शहर दुमदुमलं होतं. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, एकच जिद्द रिफायनरी रद्द, कोकण आहे झकास नका करू भकास, रिफायनरी हटवा-कोकण वाचवा अशा घोषणांनी आज राजापूर शहराचा परिसर दुमदुमला होता. जवळपास अडीच तासानंतर राजापूर शहरातून हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारो महिलांनी उत्फुर्त सहभाग नोंदवला होता. मुंबईतूनही मोठ्या प्रमाणात चाकरमनी, महिला या मोर्चासाठी आल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प इथे होता कामा नये, आम्ही आमचा जीव देऊ मात्र जमिनी देणार नाही.. हे सरकार फसवं असून केंद्रात फेकू नरेंद्र आहे तर राज्यात फसवा देवेंद्र असल्याची टीका यावेळी प्रकल्पग्रस्तानी केली. या मोर्चाच्या माध्यमातून आता प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावरची लढाई सुरु केल्याची चणुक त्यामाध्यमातून दिसून आली. त्यामुळे आता या प्रकल्पाविरोधातले आंदोलन अधिक तीव्र होणार हे नक्की.या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन भूमीकन्या एकता मंचच्या वतीने करण्यात आलं होतं. तसं निवेदनही राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आलं होतं.शिवसेना आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन देण्यात आलं होतं. पण शिवसेनेचा एकही स्थानिक नेता या मोर्चात नव्हता. त्याउलट पण मनसे, काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यासह इतर पक्षांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. सौदी अरेबियाच्या अरमाको कंपनिशी केंद्र सरकारने या प्रकल्पाबाबत करार केल्यामुळे इथले प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. या मोर्चातील पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कोडगे सरकार अशी पोस्टर्स झळकवत मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सौदीला जतोरे नाखवा, त्याने सुलतानाला कोकण विकला, अशा भावना या प्रकल्पग्रस्तानी पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केल्या.