रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार पंचक्रोशीत जमीन खरेदी केलेल्या गुजरातच्या भू माफियांची नावं आज खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केली. १११ शहा मंडळींनी इथं जमीन खरेदी केली आहे असल्याचं सांगत त्यांनी नावं जाहीर केली.
राजापूर तालुक्यातील नाणार इथल्या प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेची आज डोंगर तिठा गावात सभा झाली. रिफायनरी प्रकल्पाविरोधात आज खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. यावेळी शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने नागरीक हजर होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, रिफायनरी विरोधी शेतकरी , मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेत लँड माफियांची नावं राऊत यांनी जाहीर केली. गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच या परिसरात गुजरातच्या लँड माफियांचा सुळसुळाट झाला असून, जवळपास दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँड माफियांनी कवडीमोल दराने विकत घेतलीय असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला होता. दरम्यान आज भू माफियांची नावं राऊत यांनी जाहीर केली. सुजान शहा, बिपीन शहा, दिनेश चौधरी, किरीट शहा, गोपाळ शहा, विवेक शहा, महेंद्र कांतीलाल शहा, विवेक शहा, नितीन शहा, गणेश भुतडा, धर्मेंद्र शहा अशी अनेक नावं त्यांनी यावेळी जाहीर केली. तसेच ऋचा प्रमोटर्सच्या नावे ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यामध्ये भाजपच्या एका प्रदेश कार्यकारीनिच्या नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
दरम्यान राऊत यांनी यावेळी नारायण राणेंचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नारायण राणे रिफायनरी विरोधातला सूर आवळत आहेत. जर मंत्रिपद मिळालं असतं तर त्यांनी विरोध केला नसता. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीतही तसंच केलं. या जन्मात तरी त्यांना मंत्रिपद मिळणार नाही. मदतीच्या नावाखाली नारायण राणेंसारखी माणसं स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम करत आहेत, त्यांच्यापासून सावध रहा असं आवाहन राऊत यांनी यावेळी केली.