रत्नागिरी, (आरकेजी) : नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प स्थानिकांना नको असेल तर सरकारमध्ये असूनही शिवसेनेचा त्याला विरोधच राहील, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.
त्या नुसार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाच्या संघर्ष समितीशी चर्चा करण्यासाठी ठाकरे यांनी वेळ दिली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाकरे भेट यांची संघर्ष समिती, खा. विनायक राऊत आणि आ. राजन साळवी यांच्याशी होणार आहे.
प्रकल्पासंदर्भात शासकीय स्तरावरुन सद्यस्थितीमध्ये उभारणीची प्रक्रिया सुरु आहे. स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पामुळे १३ हजार एकर जमीन संपादित होणार आहे. त्यामध्ये १५ गावे व ८०० हून अधिक घरे, १६०० कुटुंबे,आंबा बागायती, काजूची लागवड बाधित होणार आहे.
शेतकरी कर्जमुक्तीचा लढा यशस्वी झाल्याबद्दल खा. राऊत तसेच राजापूरचे आ. साळवी यांनी नुकतीच ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी १५ जून रोजी आंदोलन करण्यात आल्याची माहिती साळवी यांनी दिली. ठाकरे यांनीही प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यास विरोध केला जाईल, असे सांगितले, अशी माहिती साळवी यांनी दिली.