
मुंबई : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफ़ायनरी प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी मंगळवारपासून कोकण रिफायनरी प्रकल्प संघर्ष संघटनेने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याने आंदोलनकर्त्यांनी कालपासून आझाद मैदानातच ठिय्या दिला आहे. आंदोलक आझाद मैदानातून हटायला तयार नाहीत.
प्रकल्प रद्द न झाल्यास आजची रात्रही आझाद मैदानात काढू. काही झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
दरम्यान, मंगळवारी पोलीस आणि आंदोलक यांच्यात तणावही निर्माण झाला होता. वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना पोलीसांनी धक्काबुक्की केली.
संघटनेतील चार जणांनी विधानभवनात जाऊन विरोध केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना सोडावे, अशी मागणी प्रमुख आंदोलनकर्ते अशोक वालम यांनी केली आहे.















