रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याचं जाहीर होताच रत्नागिरीत शिवसैनिक आणि आमदार राजन साळवी यानी फटाके फोडून जल्लोष केला.
शिवसेनेने प्रतिष्ठेचा केलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून गेली 2 वर्ष कोकणातील राजकारण तापलं होतं. युतीच्या मार्गातही हाच मुद्दा अडसर ठरत होता. नाणार रद्द करण्याची अट शिवसेनेने ठेवली होती. अखेर हा प्रकल्प या ठिकाणाहून हलवू, असं मुख्यमंत्र्यांनी युतीची घोषणा करताना जाहीर केलं होतं. पण अधिसूचना रद्द करा अशी मागणी जोर धरत होती. अखेर आज उदयोगमंत्र्यांनी या चर्चांना पूर्ण विराम या प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाली असल्याचं पात्रकार परिषदेत जाहीर केलं आणि कोकणात एकच जल्लोषाला सुरुवात झाली.
शिवसेना आधीपासूनच प्रकल्पग्रस्तांच्या सोबत होती. यामुळे हा प्रकल्पग्रस्तांचा विजय असल्याच सांगत आमदार राजन साळवी यानी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्र्याना धन्यवाद दिले.