मुंबई, ( निसार अली) : मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांनी एका समाजाचा विचार न करता सर्व समाजासाठी त्या काळात केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. आजही आपण त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा ठिकठिकाणी लाभ घेतो, असे प्रतिपादन आमदार सुनिल शिंदे यांनी केले. शनिवारी अखिल भारतीय दैवेज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे दादर येथील अँटोनियो डिसुझा सभागृह येथे झालेल्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
नाना शंकरशेट यांचे कार्य फार मोठे होते. राणीचा बाग , मुंबई महापालिका इमारत, चर्नी रोड रेल्वे स्थानक, चंदनवाडी स्मशानभुमी यासाठी त्यांनी आपली जागा समाजकार्याला मोफत दिली. मुंबईतील सीएसटी ते ठाणे हि भारतातील पहिली रेल्वे काढण्यासाठी नानांनी ब्रिटिश सरकारशी पत्रव्यवहार करून पहिली रेल्वे मुंबई येथे सुरु केली. या कार्याची दखल ब्रिटिशांनी घेऊन नानांना सोन्याचा पास देऊन तसेच त्या रेल्वेत बसण्याचा पहिला मान दिला, अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
रेल्वेचे कार्यालय देखील नानांनी गिरगाव येथील आपल्या वाड्यातून सुरु केले. नानांनी समाजकार्य हे फक्त दैवेज्ञ सोनार समाजासाठीच केले नाही तर संपूर्ण समाजासाठी जनतेसाठी केले, असेही ते म्हणाले. मी अनेक शैक्षणिक , सामाजिक कार्यक्रमांना भेट देत असतो. परंतु आज पहिल्यांदाच मला मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या कार्यक्रमाला येण्याचे सौभाग्य मिळाले यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. नानांच्या वडाळा येथील स्मारकासाठी माझी काही मदत लागल्यास महापालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नक्कीच मदत करेन, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
महापालिकेने वडाळा येथे भूखंड दिला आहे. तेथे शाळा बांधून अनेक शैक्षणिक उपक्रम आणि कोर्सेस घेणार आहोत. त्यातून रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती अखिल भारतीय दैवेज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष दिनकर बायकेरीकर यांनी दिली. नाना शंकरशेट यांचे खापर पणतु सुरेंद्र शंकरशेट, दैवज्ञ परिषदेचे मानद सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, उद्योजक आनंद पेडणेकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी, साहित्यिक रवींद्र माहिमकर, ऍड मनमोहन चोणकर आदी उपस्थित होते.