रत्नागिरी : ठाणे जिल्ह्यातील हायलॅंड ढोकाळी, माजीवाडा येथे 24 व 25 फेब्रुवारी रोजी “नमो महारोजगार” मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील आस्थापना, उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या संदर्भात बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. एम आय डी सी प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, लोटे परशुराम येथील व अन्य उद्योजक, आस्थापनांचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, “नमो महारोजगार” मेळावा प्रत्येक महसुली विभागात घेण्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना आहेत. 24 व 25 फेब्रुवारी रोजी कोकण विभागाचा हा मेळावा ठाण्यात होत आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय हेच राज्याचे उद्योगमंत्री असल्याने, आपल्या जिल्ह्याचा या मेळाव्यात मोठा सहभाग हवा. त्या दृष्टीने सर्व उद्योजक, आस्थापना यांनी आपला सहभाग नोदवावा, त्याचबरोबर या मेळाव्यासाठीचा दुवा आणि क्यू आर कोड सर्वत्र पाठवावा.