परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन(खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ.कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी,चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या, भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्रीभ्रुणहत्या, शिक्षणाचे महत्त्व इ.विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. याच कलेचे दुसारे रुप सिंधुदुर्गमध्ये पहावयास मिळते. त्याला “दशावतार” या नावाने ओळखले जाते. नमन आणि दशावतार यामध्ये बरेच साम्य आणि वैधर्म्य आहे.
याबाबतची कथा अशी की,अठराव्या शतकात शामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला. त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण कोकणात प्रसिध्द पावला. तर नमन उतर कोकणात होऊ लागला. नृत्य, नाट्य, संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार “यक्षगान” या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो. उत्सव प्रिय कोकणात सण, समारंभ म्हटले की मन उचंबळून आल्याखेरीज राहत नाही. प्रामुख्याने सणवारीत, लग्नसमारंभात, सार्वजनिक महोत्सव इ.मध्ये कोकणी संस्कृतीतील विविध लोककला आणि लोकनृत्य पहायला मिळतात. जगाच्या पाठीवर कोकणी माणूस कोठेही असला तरी या उत्सवासाठी तो आपल्या गावाकडे धाव घेतल्याशिवाय राहत नाही. कोकणात या उत्सवात “कुणबी” समाजाची लोककला व लोकनृत्य या दृष्टीने महत्त्वाची भूमिका आहे. होती व असेलच. लग्नकार्यात कोकणची लोककला नमन, दशावतार, तमाशा तर गणपती उत्सवात जाकडीनृत्य, काटखेळ, टिप-या, फुगड्या ही लोकनृत्य पहावयास मिळतात. लोककला व लोकनृत्य यातून प्राचीन कोकणच्या संस्कृतीचे जतन आपोआपच होत आहे. यापुढे ही या लोककलांचे जतन होणे काळाची गरज आहे. कोकणचे खेळे-नमन ही लोककला पूर्वी वीज नसताना पेट्रोमँक्सच्या प्रकाशात रंगायची. आज मात्र ही कला हँलोजनच्या रंगीबेरंगी दुनियेत रंगताना दिसते. काळ बदलला मात्र ग्रामीण जनतेच्या मनोरंजनाचे साधन मात्र नमन-खेळे, शक्तीतुरा हेच आहेत.
नमन खेळाची सुरुवात गावदेवीची राखण देऊन मृदंगावर थाप पडते. लग्नाच्या कार्यात, होळी (शिमगोत्सव) काळात या खेळाला बहर येतो. कोकणच्या या नमन लोककलेत ३०-४० लोक सहभागी असतात. एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे उभे राहतात. प्रत्येकाच्या हातात टाळ,डोक्यावर रंगीबेरंगी पगडी, अंगाखांद्यावर रंगीत ओढण्या असतात. या प्रत्येक कलाकारांना “खेलीया” असे म्हणतात. मध्यभागी सुत्रधार असतो. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तो करत असतो. देवाच्या नावाने हा सूत्रधार नमनाला सुरुवात करतो. बारा किंवा सोळा नमने गायली जातात. सुरुवातीला म्हटलं जाते की,”पहिले नमन हो पहिले नमन..धरती मातेला हो धरती मातेला, दुसरे नमन हो दुसरे नमन..चंद्र सुर्याला हो चंद्रसुर्याला…असे बोलत बोलत दहावे नमन, हो दहावे नमन दशमुखी रावणाला हो दशमुखी रावणाला! अशाप्रकारे नमने गायली जातात. यामध्ये दोन मृदंग वाजवणारे असतात. एका पायावर जड मृदंग घेऊन ठेका धरुन मृदंग वाजविणारे नाचू लागल्यावर प्रेक्षकांना दाद द्यावीच लागते. या नमन खेळे प्रकारात पोशाख म्हणून डोक्याला फेटा, टिळा, कानात डुल घातलेले असतात. संपूर्ण शरिरभर स्त्रियांच्या घाग-याप्रमाणे एक वस्त्र परिधान करुन लोकांचे मनोरंजनाचे काम केले जाते. गळ्यात मण्यांच्या माळा घातलेल्या असतातच. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृदंग वाजवण्याची कला असते.शिवाय या मृदंग चा आवाजही मंत्रमुग्ध करणाराच असतो. काही ठिकाणी नमनात टिप-या देखील वापरल्या जातात.
नमन या लोकनृत्य मध्ये गणगौळण मध्ये अनेक सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीरायाचा असतो. गणपती पूजन व गणपती गाणे होते. गणेश पुजनात गणेशाची आख्यायिका असते. ही सोंगे झाडांच्या लाकडापासून बनवलेली असतात. मात्र आजच्या तारखेला ही सोंगे अनेक प्रकारची हलकी व प्लास्टिक ,फायबर याची बघायला मिळतात. गणपतीच्या आगमनवेळी इतर सोंगेही दाखवली जातात. यामध्ये नटवा असतो.शंखासूर, वाघ, हरण इ. असून या प्रकारात वापरल्या जाणाऱ्या तलवारी लाकडी असतात. गण झाल्यावर “गवळण” प्रकाराला सुरुवात होते. हा भाग खुपच मजेदार व ऐकण्यासारखा असतो. दही, दूध, लोणी घेऊन गवळणी मथूरेच्या बाजाराला जात असतात. त्यांची वाट (रस्ता )गोकुळातील पेंद्या, सुदामा (श्रीकृष्ण सवंगडी) वाट अडवतात. nत्यावेळी गोपीका व पेंद्या, सुदाम यांच्यातर्फे अनेक गाणी व वेगवेगळ्या कला सादर होतात. कृष्णाचे संवगडी गवळींची वाट अडवत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लुट करतात. माठही फोडतात. यावेळी मावशी (गवळणी मधील जेष्ठ )अनेक कला सादर करुन नमन रसिकांना हसायला भाग पाडते. गवळणी गाणं म्हणताना या संवगडींना म्हणतात “दहीदुधाचे माठ घेऊनी चाललो मथूरेच्या बाजारी…दह्यादुधाचे नुकसान कान्हा तु का रे करी…!कारण कान्हा रस्त्यामध्ये उभा राहून गवळींची वाट अडवत असतो. त्यावेळी गवळणी त्याला विनंती करतात की, कान्हा सोड आमची वाट,आम्हा जाऊ दे बाजारी…दह्यादुधाने भरल्या घागरी…..! अशा त-हेरे गवळणी नंतर कौटुंबिक जीवनावर आधारीत पण एक चांगला संदेश देणारी छोटीशी नाटीका(फार्स)सादर केली जाते.या नाटीकेचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी असतो.या संपूर्ण नमन खेळात शिपाई हे आदिच्या पोलीस दलातील हवालदार प्रमाणे असतात.गंभीर विषय विनोदी करुन सांगताना त्यातून अनेक संदेश दिले जातात.आपल्या अभिनयातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत असतात.
शेवटी वगनाट्यात महाभारत ,नल-दमयंती आदी कथा किंवा एकादा सद्दस्थितीचा विचार करुन कथाभाग सादर करण्यात येतो.परमेश्वर धारण केलेल्या दहा अवतारांवर आधारीत सोंगे आणणे,त्यांच्या जीवनावरील काही घटना प्रसंगाचे खेळातून दर्शन घडवणे हा या नाट्याचा उद्देश असतो.आजच्याघडीला बदलत्या काळाप्रमाणे नवे-जुने यांचा स्विकार करत आजचे आधुनिक नमन मुंबईसह कोकणात पहावयास मिळत आहे.मुंबईत दामोदर नाट्यगृह,रविंद्र नाट्यगृह,साहित्य संघ,दिनानाथ नाट्यगृह या ठिकाणी कोकणातील मंडळांतर्फे देवदेवतांच्या मंदिर जिर्णोध्दार ,शाळा उभारणी फंड उभा करण्यासाठी नमन,खेळे किंवा शक्तीतुरा कार्यक्रम लावताना दिसतात.संघ,प्रतिष्ठान यांच्यातर्फे चाकरमान्यांचा नमन पहाता यावे म्हणून याच कार्यक्रमांचे आयोजन करत असतात.मुंबईकर चाकरमानीही उत्फूर्त प्रतिसाद देतात.आज या नमन,खेळे,शक्तीतुरा कार्यक्रमात स्त्री पात्र महिलावर्गच करताना दिसतो.आधुनिकतेप्रमाणे सध्या या लोककलेकडे व्यावसायिक दृष्टिकोणातून पाहिले जात आहे.त्याचे रुपही बदलत आहे.पारंपरिक पद्धतीत आधुनिकतेची भर पडली आहे.मात्र दशावताराप्रमाणे या नमन लोककलेला मानाचे स्थान प्राप्त झाले नाही.कोकणात नमनाच्या संवर्धनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत.कोकणात या कलेला जनाधार असतानाही शासन या कलेकडे दुर्लक्षच करत आहे.याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.कोकणचे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्षच आहे.तमाशाला सोन्याचे दिवस आले.मात्र शासनाच्या दुर्लपणामुळे नमन या कलेला वाईट दिवस आले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.नमन कलाकारांची ” रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा ” अशी स्थिती आहे.आधुनिकतेचा पगडा पडलेली ही नमन कला अशीच यापुढेही चालु राहवी म्हणून संदिप कानसे ग्रुपचे स्त्री पात्रानी नटलेले तरुण मित्र मंडळ,चिखली(गुहागर)चे नमन, तसेच एस.भारती हे देखील नमन जोपासण्यासाठी धडपडत आहेत.शिवाय नव जवान बाळ कला मित्र मंडळ मु.पो.मुर्तवडे(कातळवाडी),ता,चिपळून,जि.रत्नागिरी तसेच मु.कोंडये,ता.लांजा उत्कर्ष सेवा संघ(मुंबई)यांचे बहुरंगी नाट्य रुपी नमन,राजापूर ,लांडे ,संगमेश्वर तालुक्यातील निवडक कलाकारांच्या कलाकृतीने नटलेले आणि प्रथमच स्त्री कलाकारांच्या कलागुणाने संपन्न असलेले कोकणातील लोकप्रिय श्री मुंबादेवी नमन मंडळ,मुंबई यांचे बहुरंगी नमन,गुढेकर ग्रुपचे नमन व श्रीराम सेवा मंडळ बामणोली उगवतीवाडी ता.संगमेश्वर (निर्माता /दिग्दर्शक दिपक शेवडे तसेच कोकणातील अन्य नमन मंडळे प्रयत्न करत आहेत.लोककलेतून समाज प्रबोधन व लोकजागृती करणारी ही “नमन “लोककला जोपासायला हवी हीच आमची प्रमाणिक अपेक्षा !
शांत्ताराम गुडेकर
पार्क साईट,(विक्रोळी )
भ्रमणध्वनी-९८२०७९३७५९