रत्नागिरी, (आरकेजी) : राजापूर तालुक्यातील नाणार पंचक्रोशीत होवू घातलेल्या प्रस्तावीत ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र विरोध होऊ लागला आहे. आज तिसऱ्या दिवशीही जमिनीची मोजणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळून लावला. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली आहे.
प्रस्तावीत ग्रीन रिफायनरीला नाणार, पाळेकरवाडी, दत्तवाडी चौके आणि कात्रादेवी या गावातील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरून या जमीन मोजणीला तीन दिवसांपासून विरोध करत आहेत. जमिन अधिग्रहणासाठी महसुल विभागाचे अधिकारी इथं तळ ठोकून आहेत. पण प्रकल्पाला विरोध असल्यानं इथल्या प्रकल्पग्रस्तांनी सलग तिसऱ्या दिवशी इथली मोजणी बंद पाडली. नाणारसह आसपासच्या १५ गावातून इथं होणाऱ्या जमिन मोजणीला विरोध होत आहे. शेकडो ग्रामस्थ सध्या या मोजणीला रस्त्यावर येवून विरोध करतायत. दरम्यानं प्रकल्पाच्या तोडग्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे येणाऱ्या नागपूर अधिवेशनात आमरण उपोषणाचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिला आहे. पोलिसी बळाचा वापर करुन प्रशासनाने मोजणी सुरु केली, असा आरोप समितीने केला आहे.
आमदार साळवींना करावा लागला स्थानिकांच्या रोषाचा सामना
सागवे गावातील कात्रादेवीवाडी येथे मोजणीच्या ठिकाणी राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी मंगळवारी ग्रामस्थांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच राजापुरात येवून आम्ही जनतेसोबत आहोत असं बोलून गेले, मग ही मोजणी का थांबवली जात नाही…तुम्ही या अधिका-यांना मोजणी थांबवण्याचे आदेश का देत नाहीत, अशा अनेक प्रश्नांचा भडीमारच स्थानिकांनी केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी बैठक मुंबईमध्ये घेतली, त्यामध्ये जे दलाल म्हणून गेले होते, त्यांना कोणी बोलावलं होतं. अख्ख गाव विकून खाणारे प्रकल्पाचे समर्थ म्हणून तुम्हाला चालतात. मात्र इथे रस्त्यावर येवून आम्ही विरोध करतो ते दिसत नाही का? दोन वेळा तुम्हाला आम्ही आमदार म्हणून निवडून दिलं मग, प्रशासन आमचं एेकत नाही, जबरदस्ती करतंय मग आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे? असे प्रश्न आमदार राजन साळवी यांना विचारले गेले.