रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : पिरंदवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अडचणीत आल्या असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी संरपंचांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. अफरातफर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
करवसुली करून बँकेत न भरता परस्पर खर्च केला. लाखोंची ही अफरातफर केली. ग्रामपंचायतीमधून प्रत्येक जमा नमुन्यांची बनावट पावती पुस्तके वापरून ग्रामस्थांना बनावट पावत्या दिल्या. घरपट्टी निधी परस्पर जमा करून तो बँकेत भरणा नाही. परिणामी मागील दोन वर्षे १५ टक्के मागासवर्गीय निधीच उपलब्ध न झाल्याने तो खर्ची पडला नाही. गेली तीन-चार वर्षे १० टक्के महिला बालकल्याण खर्च दप्तरी केलेला दिसून येतो. प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत तो पोहोचलेला नाही. ग्रामपंचायत कार्यालयात वेळवर येत नाहीत. काही विचारणा केल्यास सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांना उद्धट उत्तरे दिली जातात. विकासकामे करताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले जात नाही, आदी तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनात नमूद आहेत. सरपंच श्रीकांत गंगाराम मांडवकर यांनी या निवेदनाची प्रत पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, जि. प. सदस्य, जिल्हा परिषद, पालकमंत्री रवींद्र वायकर, मंत्री रवींद्र चव्हाण आदींना दिली आहे. दरम्यान, ग्रामसेविका कल्याणी चव्हाण यांच्याविरोधात २ मार्च २०१५ ला तत्कालीन सरपंच रामचंद्र लोखंडे यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही. अनेकदा ग्रामसेविकेला सुधारणा करून दप्तर सुस्थितीत करण्यास अनेक संधी दिल्या. परंतु, अद्याप कोणतीही सुधारणा त्यांनी केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीवरून पुन्हा तक्रार करण्यात आली आहे.