
…. म्हणून मी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला – निमकर
रत्नागिरी : गेली 24 वर्षे मी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक पदांवर काम केलेलं आहे, तरीही कोकण पदवीधर मतदारसंघातून माझा उमेदवारीसाठी विचार झाला नाही. त्यामुळेच आपण यावेळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत मला निवडून दिल्यास कोकण साठी भरीव कामगिरी करणार असल्याची ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नागेश किसनराव निमकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मी वीस वर्षांपूर्वीपासून कोकणात येतो पण वीस वर्षांपूर्वीचे कोकण आजही कायम आहे, कोणताही विकास म्हणावा तितक्या गतीने झालेला नाही. गेल्या दोन दशकांच्या काळात कोकणात काय विकास झाला हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आपण विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्रात गेल्यानंतर विकास म्हणजे काय असतो हे तेथे पाहिल्यावर दिसून येईल परंतु असा विकास कोकणाच्या बाबतीत मात्र झालेला नाही आणि कोकण त्यामुळे दोन दशके विकासाच्या बाबतीत मागे राहिलेला आहे. कोकणातील दळणवळणाची साधने अपुरी आहेत. असलेले रस्ते हे खराब स्थितीत आहेत. विकासाबाबत कोकणमध्ये प्रचंड क्षमता आहे परंतु त्या क्षमतेचा आतापर्यंत वापर झालेला नाही केवळ रासायनिक उद्योग धंदे पुढे आणले जातात आणि त्याला विरोध होतो. परंतु छोटे-मोठे उद्योग उभारून कोकणची आर्थिक स्थिती मजबूत करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि मला निवडून दिल्यास याबाबतीत मी निश्चितपणे प्रयत्न करीन, असे निमकर म्हणाले.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे स्वरूप मोठे आहे. पाच जिल्ह्यांचा समावेश या मतदारसंघात आहे. त्यामुळे मतदारसंघात सर्व मतदारापर्यंत पोहोचणे हे अवघड स्वरूपाचे काम आहे. तरीही आपण 2020 पर्यंतच्या मतदार यादीनुसार सर्वांना निवडणुकीत उभे राहत असून आपल्याला मत का द्यावे याबाबतचे पत्र पाठवले आहे. असंख्य सरपंचांना व्यक्तिगत पत्रे पाठवून त्यांच्याकडूनही सहकार्याची मागणी केली आहे. कोकणात डहाणू दिवा गोवा वंदे भारतच्या चार ट्रेन चालू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र शासनातील कृषी विभागाला आंबा व्यापार आणि फळबागायती यांना प्रोत्साहन देण्यासाठी, प्रत्येक पूरक शेतीला बिनव्याजी कर्ज देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोकणातल्या पदवीधरांना शेतीपूरक तथा स्वयंरोजगार उद्योग उभे करण्यासाठी 15 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार व त्या कर्जावरती सबसिडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.
कोकणात पर्यटन उद्योग वाढण्यासाठी प्रयत्न करणार असून कोकणात पालघर विरार अलिबाग कॉरिडॉर रोड थेट सिंधुदुर्ग पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोकणातील जमिनीवर दर्जेदार फुलांची शेती होण्यासाठी भरीव प्रयत्न केले जातील. जसे गुलाब झेंडू मोगरा चाफा शेवंती इतर आदी फुले यांचा त्यात समावेश असेल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससी यासाठी मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा माझा मानस आहे, असेही नागेश निमकर म्हणाले. तसेच त्यांनी पदवीधर मतदारांना आपल्याला मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.















