मुंबई : मनसेतून पक्षांतर केलेल्या त्या सहा नगरसेवकांबाबत गुरुवारी आयुक्तांच्या मुंबई कार्यालयात सुनावणी झाली. कोकण विभागीय आयुक्तांनी दोन्ही पक्षांच्या बाजू एेकून घेतल्या आहेत. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
मनसेतून बाहेर पडलेल्या त्या सहा नगरसेवकांनी ऑक्टोबरमध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेने त्यावर आक्षेप घेत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. नगरसेवकांनी यावर लेखी उत्तर मांडण्याची सूचना कोकण विभागीय आयुक्तांनी केली होती. महिनाभरापूर्वी त्यानुसार लेखी उत्तर आयुक्तांना सादर केले. गुरुवारी इतर बाबींवर विभागीय आयुक्तांच्या समोर सुनावणी झाली. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी यावेळी आपली बाजू मांडली. ते नगरसेवक मनसेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढल्याने आमचेच नगरसेवक असल्याचा युक्तीवाद मनसेच्या वकीलांनी केला. तर शिवसेनेने प्रतिवाद करताना नगरसेवकांच्या कायदेशीरबाबींकडे लक्ष वेधले. दोन्ही पक्षांनी केलेल्या युक्तीवादाचा तपशील गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांपुढे ठेवण्यात आला. मनसेकडून अॅड. अक्षय काशीद यांनी तर शिवसेनेकडून आमदार अनिल परब यांनी बाजू मांडली. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
चौकट
मनसेला कायद्याचे दार उघडे
या नगरसेवकांच्या गट स्थापनेची मागणी आम्ही केली, नियमात राहून मागणी केली आहे. शिवसेनेचे ८४ नगरसेवक असून, तीन अपक्ष आणि मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले सहा अशी एकूण ९३ नगरसेवक संख्या आहे. त्याचा तपशील गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे ठेवला आहे. ‘शिवसेनेत आलेल्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी मनसेला कायद्याचे दार उघडे आहे, आम्ही त्यालाही तयार आहोत – अॅड. अनिल परब व आमदार शिवसेना
ते नगरसेवक आमचे
हे नगरसेवक ‘मनसे’च्या चिन्हावर निवडून आले आहेत त्यांना शिवसेनेत प्रवेश करायचा असल्यास त्यांना नगरसेवक पद सोडावे लागेल. त्यासाठी काही दाखले आम्ही कोकण विभागीय आयुक्तांसामोर ठेवले आहेत. – अक्षय काशीद, मनसेचे वकील