मुंबई : जात पडताळणी समितीने अवैध ठरविलेल्या पाच नगरसेवकांपैकी तिघांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. यामध्ये जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याप्रकरणी तीन नगरसेवकांचे पद रद्द केल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बुधवारी महासभेत केली. या निर्णयामुळे पालिकेत भाजपला हादरा बसला असून शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
मुंबई महानगर पालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसच नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ७६ मधील भाजपच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ६७ च्या भाजप नगरसेविका अॅड. सुधा सिंग आणि प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा या पाच नगरसेवकांचे जातीचे दाखले जात पडताळणी समितीने अवैध ठरविले होते. त्यामुळे संबंधित आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपले पद धोक्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवत प्रमाणपत्र अवैधच असल्याचा निर्णय दिला. यामुळे प्रभाग क्र. २८ मधील काँग्रेसचे राजपती यादव, प्रभाग क्र. ७६ मधील भाजपच्या केशरबेन पटेल आणि प्रभाग क्र. ८१ मधील मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे महासभेत जाहीर केले. नगरसेवक पद रद्द झालेल्या ठिकाणचे तीनही वॉर्डमधील दुसर्या क्रमांकावरील उमेदवार शिवसेनेचे शंकर हुंडारे आणि संदीप नाईक तर काँग्रेसचे नितीन सलाग्रे हे लघुवाद न्यायालयात आपण विजयी असल्याचा दावा करू शकणार आहेत. या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर पुन्हा पालिकेच्या महासभेत महापौर याबाबतची अधिकृत घोषणा होईल. त्यामध्ये शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा एक नगरसेवक वाढणार असून पालिकेतही शिवसेनेची ताकद वाढणार आहे.