वरच्या मजल्याच्या ग्रील काढून 75 वर्षांच्या सासऱ्यांना पत्र्यावरून नेलं दुसऱ्या ठिकाणीरत्नागिरी, प्रतिनिधी : चिपळूणचा महापूर ओसरून 8 दिवस उलटून गेलेत, पण महापुराने पाठीमागे सोडलेल्या खुणा हा पूर किती भयानक होता हे दाखवून देतात. शहरातील जवळपास प्रत्येक नागरिकाचं नुकसान झालेलं आहे, यातून सावरायला काही महिने कदाचित काही वर्षही लागू शकतात. दरम्यान या पुरात अनेकांनी अतिशय भयाण परिस्थिती अनुभवली, अनेकजण मृत्यूच्या दाढेतून परत आलेले आहेत. नदीकाठच्या नागरिकांची स्थिती तर अतिशय भयाण आणि गंभीर होती. या पुराचा त्यांनी केलेला सामना त्यांच्या मुखातून ऐकताना अंगावर रोमांच उभं राहतं.
चिपळूण शहरातल्या पेठमाप परिसरातील संपदा खेडेकर यांनीही या भयानक परिस्थितीचा सामना अगदी जिद्दीने केला. आणि कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवले. संपदा खेडेकर यांचं घर पेठमापमध्ये, वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यालगतच. मात्र या पुराने आता इथे राहायचं की नाही अशी स्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली त्यावेळी, घरात 7 जण होते. या पुरात घराजवळची 8 ते 10 फूट जमीन नदीच्या पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली, घराजवळची नारळाची झाडं तसेच अन्य झाडं वाहून गेली. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज खेडेकर कुटुंबियांना आला. खेडेकर कुटुंब पाणी भरू लागल्यावर वरच्या मजल्यावर गेलं, खाली घरात 12 फूट पाणी, मात्र पुराची परिस्थिती पाहता घरात राहणं धोकादायक होतं. त्यात घरात 75 वर्षांचे सासरे होते, त्यांना दम्याचा त्रास. अखेर वरच्या मजल्यावरच्या ग्रील काढून खेडेकर कुटुंबीय पत्र्यावर चढून दुसऱ्या घरी गेले. सासऱ्यांना आम्ही कसे घेऊन ते आमचं आम्हाला माहीत अशी प्रतिक्रिया संपदा खेडेकर यांनी यावेळी दिली, तसेच ही सर्व परिस्थिती सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान नदीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांची आहे, ही मागणी आता पुन्हा जोर धरू लागली असून, याचा गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे, अन्यथा इथल्या नागरिकांसमोर भविष्यात आणखी भयंकर संकट उभं राहू शकतं.














