रत्नागिरी (आरकेजी)- राजापूर तालुक्यातल्या नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. अशातच प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आणि भूमी अभिलेख प्रांतांच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी अडवल्याने सर्वेक्षण पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
राजापूर येथील उफळे गावात प्रांत, तहसीलदार आणि भूमी अभिलेख यांची टीम बुधवारी सर्व्हे करण्यासाठी गेली होती. मात्र ग्रामस्थांनी एकत्र येत या ठिकाणी या पथकाला विरोध नोंदवला आणि आम्हाला प्रकल्पच नको अशी ठाम भूमिका घेतली. यामुळे सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या पथकाला रिकाम्या हाताने परत फिरावं लागलं. कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किना-यावर जगातील सगळ्यात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना याच अणु ऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरावर आता जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी येणार आहे. याकरिता आंबा -पर्यटन मच्छिमारी करीता संपन्न असलेल्या नाणार आणि अन्य गावांची सरकारी पातळीवर निश्चिती झाली आहे. मात्र जगातील सगळयात मोठी रिफायनरी आणण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आता इथली जनताही एकवटत आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी १४ गावातील लोक एकत्र येत आता विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाकरिता येथील स्थानिक शेतकऱ्यांची १४ गावातील १३०० एकर जमीन या करीता सरकार ताब्यात घेणार आहे. इथल्या रेडीरेकनरच्या दराच्या किमान तिप्पट दर सरकार इथल्या शेतकऱ्याला देईल हे स्पष्ट आहे. त्याच बरोबर विस्थापित होणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना अत्याधुनिक सुविधांसह गाव वसवली जातील असा दावा सरकार करत आहे. पण आम्हाला प्रकल्पच नको अशी ठाम भूमिका सध्या याच १४ गावातील लोकांनी घेतल्यामुळे आता या रिफायनरी प्रकल्पाला विरोध आता वाढतोय.