रत्नागिरी, (आरकेजी) : राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होणार्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. उद्या गुरुवारी या परिसरात तीव्र आंदोलन केले जाणार आहे. तसेच उद्यापासून शाळा सुरु होत आहेत. सरकारचा निषेध म्हणून शाळेमध्ये मुलांना न पाठवण्याचा निर्णयदेखील स्थानिकांनी घेतला आहे. शिवसेनेनेही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
नाणार परिसरातील १४ गावांत रिफायनरी प्रकल्प सरकार उभारणार आहे. २ लाख कोटी खर्च करून प्रकल्प उभारण्यात येणार आहे़. त्यासाठी कारशिंगेवाडी, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पालेकरवाडी, कारिवणे, कात्रादेवी, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ, गोठिवरे या गावातील जमीनी संपादीत करण्यात येणार आहेत. स्थानिकांचा प्रकल्पाला जोरदार विरोध आहे. १४ गावांनी एकत्र येत विरोधाचा ठरावही केला आहे.
उद्या शाळेत न जाता विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन प्रकल्पविरोधी निवेदने देणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी राज्य सरकारला दिला आहे.