मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी)- पालिका मुख्यालयात असणाऱ्या मुस्लिम नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी नमाज पठण करण्यासाठी प्रार्थनागृहाची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. यासंदर्भातील पत्र महापौरांना देण्यात आले आहे. यामागणीमुळे वाद होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत सर्वपक्षातील मुस्लिम नगरसेवकांची संख्या अधिक आहे. तसेच पालिका मुख्यालयात मुस्लिम अधिकारी, कर्मचारी यांची संख्या अधिक आहे. मात्र त्यांना मुस्लिम धर्मातील रितिरिवाजनुसार पाच वेळ नमाज पढण्यासाठी जागेची अडचण असते. नगरसेवक, नगरसेविका यांना पक्ष कार्यालयात नमाज पढावा लागतो. तर पालिका अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयात अथवा जेथे जागा मिळेल तेथे कुठेही नमाज पढावा लागतो. त्यामुळे पालिका मुख्यालयात नमाज पढण्यासाठी एक प्रशस्त जागा आरक्षित करून तेथे प्रार्थनागृहाची सुविधा करून देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे गुरुवारी एका पत्राद्वारे केली आहे. सपाच्या मागणीवर पालिका आयुक्त व महापौर हे काय व कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी ही शेख यांनी पालिकेत वादग्रस्त मागण्या केल्या होत्या. त्यात शालेय विद्यार्थ्यांना २७ वस्तू दिल्या जातात. यामध्ये उर्दू माध्यमिक शाळेतील मुलींना स्कार्फ समाविष्ट करण्याची मागणी शेख यांनी केली होती. तसेच पालिका शाळांमध्ये सूर्यनमास्कर अनिवार्य करण्यावर आक्षेप घेतला होता. सूर्यनमस्कार करणे, शाळांमध्ये अनिवार्य केले जाऊ नये कारण उर्दू माध्यमिक शाळा मुले तसे करणार नाहीत, कारण सूर्यनमास्कर हिंदू आणि मुस्लिम समुदायात देव सूर्य यांची पूजा करत असल्यानेच अल्लाहची आणि त्यांच्या धर्माच्या विरोधात असल्याचे विधान केले होते. शाळांमध्ये वंदे मातरम् बोलण्यास अनिवार्य करण्यावर त्यांनी हरकत नोंदवल्याने ते टीकेचे धनी झाले होते. आताही प्रार्थनागृहाची मागणी केल्याने ते वादात सापडण्याची शक्यता आहे.