मुंबई, (निसार अली) : मालाड-मालवणी मधील ‘दि यंग मुस्लिम असोसीएशन’ संचलित ‘जामा मशिद’ कोरोना विरोधी लढ्यात उतरली आहे. मशिदीची जागा कोरोना संशयितांच्या विलगीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. परवानगी मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनती पत्र लिहिले आहे.
मालवणी प्रवेशद्वार क्रमांक 2 येथील जामा मशीद प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, “मशीदमधील 7000 चौरस फुट जागा कोरोना संशयितांच्या विलगीकरणासाठी तात्पुरत्या स्वरुपात सरकारला उपलब्ध करून देण्याचा निर्णय मशीद प्रशासनाने घेतला आहे.”
“काही दिवसांपूर्वी नागपूरच्या बडी मशीदने देखील या प्रकारे निर्णय घेतल्याची बातमी होती. देश सेवेसाठी खारीचा वाटा आम्ही उचलत असल्याचे संस्थेचे विश्वस्त रिजवान क़ादरी यांनी सांगितले. अशा प्रकारे निर्णय घेणारी मुंबईमधील ही पहिली मशीद असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.