मुंबई, (निसार अली) : मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते व रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यांवर पाणी साचले. घरांत पाणी शिरले. मिठी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत आल्याने शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. अजूनही मध्य रेल्वे सुरू झाली नसल्याने प्रवासी विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत.
दोन दिवसांपासून पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढले. परिणामी तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पाणी साचल्याने रस्ते वाहतूकीची गती मंदावली.
मिठी नदी धोक्याची पातळीपर्यंत आली. खरबदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या मदतीने कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरातून १३०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
महापालिकेच्या सहा उदंचन केंद्रांमधील पंप चालू करण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली.
मालवणीत प्रवेशद्वार क्रमांक 7, भाजी मार्केट, आझमी नगर, आंबोजवाडीसह इतर भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मार्वे रोड वर मीठ चौकी पूलाजवळ दीड फूट इतकं पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. मालाड सबवे खबरदारी म्हणून पोलिसांनी बंद केला. सबवे बंद केल्याने चिंचोली येथील वीर सावरकर उड्डाणपुलावरुन दोन ते तीन किलोमीटरचा पल्ला गाठावा लागला.
गोरेगाव पूर्वेतील ओबेरॉय मॉल येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कांदिवलीत पश्चिमेतील चारकोप, गणेश नगर, लालजी पाडा येथील काही ठिकाणी पाणी तुंबले होते. तसेच कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज महिंद्रा गेट येथे ही पावसाचे पाणी साचल्याने रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अंधेरी पश्चिमेतील रस्त्यांवर व दत्ताजी साळवी पालिका मंडईत पाणी साचल्याने व ते पाणी दुकानात शिरल्याने दुकानदारांचे आर्थिक नुकसान झालं.
पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. किंग्ज सर्कल, जोगेश्वरी लिंक रोड या ठिकाणी पाणी साचले. गणेशोत्सवात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाविकांचा हिरमोड होत आहे. आणखी 2 दिवस पावसाचा जोर कायम असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.