
रत्नागिरी : रत्नागिरीतील मुरुगवाडा, मिऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. समुद्रकिनारी असलेल्या मुरुगवाडा ते मिऱ्या भागात पक्की टेट्राॅपॉडची संरक्षक भिंत बांधावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
मुरुगवाडा १५ माड ते मिऱ्या भागामध्ये भगवती बंदर व मिरकरवाडा मच्छीमारी बंदराचे टप्पा क्र. १ व २ चे बांधकामामुळे गेली अनेक वर्षे समुद्राचे पाण्याचे अतिक्रमण होत आहे. या संपूर्ण भागामध्ये पक्की टेट्राॅपॉडची संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी गेली.
अनेक वर्ष ग्रामस्थ करत आहेत. मात्र त्याकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यात पावसाळ्यात समुद्राचे अतिक्रमण एवढं होतं की हा भाग पूर्णपणे समुद्रात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. सध्या पावसाळा संपूनही समुद्राने पावसाळ्यात गाठलेली धोकादायक हद्द अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे पुढील पावसाळ्यात या गावांत नागरी हद्दीत निश्चितच पाणी शिरण्याची व त्यामुळे येथील ग्रामस्थांचे स्थावर व जंगम मालमत्तेस तसेच मानवी जिवितास धोक्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं ग्रामस्थाचं म्हणणं आहे. त्यामुळे या भागात तातडीने पुढील पावसाळ्यापूर्वी पक्की टेट्राॅपॉडची संरक्षक भिंत बांधावी, या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आला. पांढरा समुद्रापासून जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शेकडो ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते..