रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या माळीण गावातील एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिनेश शिगवण असं या तरुणाचं नाव आहे. घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरड्या नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.माळवी गावातील दिनेश शिगवण हे केळशी येथील महावितरण कार्यालयात वायरमन म्हणून कंत्राटी तत्वावर काम करत होते. त्यांची दोन लग्न झाली असून दोन्ही पत्नींबरोबर ते एकत्रच रहात होते. दोन दिवसांपूर्वी दिनेश शिगवण बैलाला घेऊन बाहेर पडले. मात्र संध्याकाळ झाली तरी न परतल्याने शोधाशोध सुरु झाली. मात्र कुठेच पत्ता न लागल्याने दापोली पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सर्वच ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर नदीच्या कोरड्या पात्रात दिनेश यांचा मृतदेह डोकं फुटलेल्या अवस्थेत आढळून आला. या तरुणाच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत दापोली पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन बायका , म्हातारी आई , आणि चार मुलींचा पोशिंदा असलेल्या दिनेशचा खून झाल्याने त्याचे कुटुंब पोरके झाले आहे.