
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पश्चिम डोंबिवलीत टोळक्याच्या हल्ल्यात एक तरुण ठार झाल्याची घटना रविवरी रात्री घडली. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर पोलिसांनी एक हल्लेखोर संशयीताला ताब्यात घेतले आहे. सचिन पाटील (25) असे मृत तरुणाचे नांव असून तो जुनी डोंबिवली परिसरात राहतो.
उपलब्ध माहितीनुसार सचिन पाटील आणि अमोल म्हस्के हे दोघे दुचाकीबरून स्टेशनकडे जात होते. इतक्यात शिवमंदिराजवळ दबा धरून थांबलेल्या सिद्धेश कुलकर्णी, सचिन कळसुळकर, अमित सुर्वे, राहुल नगरे आणि अजित सुर्वे या चौकडीने दुचाकी अडविली. एक महिन्यापूर्वी सचिन पाटील आणि या चौकडीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद रविवारी रात्री उफाळून आला. सचिन पाटील याला दुचाकीवरून लाथ मारून खाली पाडले आणि त्या चौकडीने त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. चाकूचे जीवघेणे वार झाल्यामुळे सचिन पाटील हा जागीच ठार झाला. या झटापटीत हल्लेखोर टोळक्यातील सिद्धेश कुलकर्णी हा देखील जबर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सचिन पाटील हा ठार झाल्याची खात्री पटताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी पडलेल्या सचिन पाटील याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठविला. पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन सचिन कळसुळकर, अंकुश म्हस्के यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्हात वापरलेले हत्यार हस्तगत करण्यात आले. यातील अन्य हल्लेखोर अमित आणि अजित सुर्वे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर जखमी हल्लेखोर सिद्धेश कुलकर्णी याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
चार महिन्यात डोंबिवलीत तीन खून :
शैक्षणिक– सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहराला पूर्वीच्या नव्वदीच्या दशकाची पिडा लागल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या चार महिन्यात तीन खून पडले असून डोंबिवलीत कायदा सुव्यवस्था आहे का अशी विचारणा होत आहे. रविवारी जुन्या डोंबिवलीत क्षुल्लक कारणावरून सचिन पाटील याचा खून करण्यात आला. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी गेल्या महिन्यात कुंदन जोशी याचा खून झाला होता. त्यानंतर निवासी विभागात दीपक चौहान या भंगारवाल्याचा अत्यंत निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह बेवारस स्थितीत टाकण्यात आला होता. लागोपाट शहरात खुनाचे सत्र सुरु असल्याने कायदा धाब्यावर बसविला जात आहे का असे प्रश्न सामान्य डोंबिवलीकर विचारात आहेत.














