मुंबई : गोरेगाव आरे कॉलनीत गुरुवारी भरदुपारी फिल्मी स्टाईलने एकाची निर्घुंण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डेअरीच्या सुरक्षा रक्षकांच्या गेटजवळ विरापांडियन इलायपेरुमल (वय ३४) याच्यावर अज्ञात व्यक्तिंनी चॉपरने सपासप वार केले. आरोपींच्या तपासासाठी आरे पोलिसांनी श्वान पथकाचे सहाकार्य घेत तपास सुरू केला आहे. विरापांडियन हा फिल्मसिटीत खासगी सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता.
अशी घडली घटना
आरे डेअरीतील उपहारगृहात तो चहा पिण्यासाठी आला होता. तेथे आलेल्या तीन जणांनी त्याच्याशी वाद घातला. भांडणाचे रूपांतर बाचाबाचीत होऊन तिघांनी विरापांडियवर हल्ला केला. उपहारगृहाची सुद्धा तोडफोड केली. याचदरम्यान विरापांडियनने जीव वाचविण्यासाठी सुरक्षारक्षक कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. परंतु, मागे धावत आलेल्या एका व्यक्तीने विट फेकून मारली. त्यामुळे तो खाली कोसळला. त्यानंतर चॉपरच्या सहाय्याने त्याला मारण्यात आले. घटनेननंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पाठविला.
घटनेतील मारेकरी एकाच परिसरातील आहेत. त्यांचे विरापांडियनशी वाद होते. याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
विरापांडियन हा आरे कॉलनीतील यूनिट क्रमांक सात मध्ये राहत होता. फ़िल्मसिटीचे नविन टेंडर मिळाल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असा संशय पोलिसांना आहे.