
मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) – कंत्राटी कर्मचा-यांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या अगोदर देण्यात यावे, वार्षिक वेतनवाढ नियमाने देण्यात यावी, महिलांना प्रसूती रजा तसेच भरपगारी रजा देण्यात यावी, सन २०१८ पासून शासन निर्णयाप्रमाणे झालेली वेतनवाढ तसेच वार्षिक वेतनवाढ आणि अनुभव भत्ता मिळणेबाबत या आणि इतर मागण्यांसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्यावतिने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या या काम बंद आंदोलनामुळे मुंबईत आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे बाबा कदम यांनी सांगितले.
परळ येथील एफ दक्षिण येथील पालिकेच्या कार्यालयाबाहेर डीएस इंटरप्रायझेस कंत्राटदाराच्या विरोधात काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सचिव संजय वाघ यांच्या उपस्थितीत हजारो कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील सन २०१६ पासून कार्यरत असलेल्या डी. एस. इंटरप्रायझेस कंत्राटदाराकडून कामगार कर्मचा-यांना मागील १ महिन्याचे वेतन अद्याप देण्यात आले नसून मिळणारे वेतनही वेळेवर देण्यात येत नाही. अतिरिक्त कामे देऊन महिला वर्गास नाहक त्रास दिला जातो शिवाय इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे डी.एस. इंटरप्रायझेस यांच्याविरोधात बेमुदत काम बंद आंदोलनाला आज सकाळ पासून सुरवात करण्यात आली. हजारो कर्मचारी आंदोलनात उतरल्यामुळे दैनंदिन आरोग्य सेवेवर त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.














