मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून 5 ऑगस्ट किंवा उशिरात उशीर 15 ऑगस्टपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा पनवेल ते इंदापूर हा पहिला टप्पा मार्च 2018 पर्यंत तर इंदापूर झाराप हा दुसरा टप्पा मार्च 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
आमदार नारायण राणे यांनी महामार्गाच्या चौपदरीकरण आणि खड्डे या विषयावर लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर पाटील उत्तर देताना बोलत होते.
पाटील म्हणाले, चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या 80 टक्के जागेचे भुसंपादन झालेले नाही. यामुळे निविदा काढण्याचे काम पूर्ण झालेले नाही. यासाठी एका वेळी 2 ठेकेदारांकडून काम करून घेतले जात आहे. त्याचे काम तपासून देयक अदा केले जाणार असल्याचेही सांगितले. या लक्षवेधीवर बोलताना वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, कोकणात जाणाऱ्या वाहनांना मागच्या वर्षी गणेशोत्सव काळात पुणे द्रूतगती मार्गाने जाणाऱ्या वाहनांना टोल माफी दिली गेली होती. त्याचप्रमाणे याहीवर्षी टोलमाफी देण्याचा प्रयत्न करु अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या लक्षवेधीमध्ये सदस्य सुनील तटकरे, विद्या चव्हाण, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.