झेंडूच्या शेतीतून मिळवले भरघोस उत्पन्न; आंतरपिकांनी दिला फायदा
कोकणवृत्तविशेष
रत्नागिरी, (आरकेजी) : नियोजन, व्यवहार ज्ञान, आंतरपीक ही त्रीसूत्री वापरल्यास शेतीतून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते हे अविनाश जाधव या शेतकर्याने दाखवून दिले आहे. लांजा शहरात रँम्पवर गाड्या धुता धुता अविनाश अचानक शेतीकडे वळला. दिड एकर शेतात सेंद्रिय पद्धतीने झेंडूची फायदेशीर शेती त्याने केली.
अविनाश मुंबईत राहत होता. तेथील धकाधकीचे जीवन सोडून काही व्यवसाय उभारावा, या जिद्दीने तो रत्नागिरीत आला. लांजा शहरात त्याने रँम्पवर गाड्या धुण्याचे काम करण्यास सुरुवात केली. बारावी उत्तीर्ण असणाऱ्या अविनाशला शेतीची आवड होती. शेतीकडे वळण्याची इच्छा असूनही तो शेतीपासून दूर जात होता. अखेर अविनाशच्या मनात सेंद्रीय शेती करण्याची तीव्र इच्छा झाली. कामावलेली संपूर्ण पुंजी देऊन त्याने लांजा शहरात तीन एकर जमीन विकत घेतली.
भरघोस पीक तयार झाले
दिड एकरात त्याने झेंडूची लागवड केली. काही प्रगतशील शेतकरी मित्रांशी विकारविनिमय केला. कलकत्ता आँरेंज आणि गोल्डन यलो जातीच्या गोंड्यांची लागवड केली. त्यासाठी सर्वप्रथम पाण्याची व्यवस्था केली. दिड एकरात १६०० झेंडूच्या झाडांची लागवड केली. झेंडूच्या शेतात आंतरपीक म्हणून काकडी आणि शेवग्याच्या शेंगा अशा दोन पिकांचीही लागवड केली . सध्या ६०० झेंडूच्या झाडापासून ४००किलो झेंडूचं उत्पादन अविनाश यांना मिळालय. योग्य नियोजन,मेहनत आणि सेंद्रीय खतांच्या वापरावर त्याने भर दिला. शेणखत आणि मेढ्याची लेडीचे खत त्याने वापरले. त्या जोरावर आज झेंडूचे भरघोस पिक शेतात तयार झाले आहे.
वर्षाकाठी चार लाखांचा नफा
अविनाश यांचा झेंडू ६० रुपये किलो दरांनी सध्या लांजा बाजारात विकला जात आहे. रँम्पपेक्षा शेतात अविनाश जास्त वेळ देतो. झेंडूच्या आणि इतर आंतरपिकांच्या माध्यमातून अविनाशला वर्षाकाठी चार लाखांना नफा होणार आहे. सध्या सेंद्रीय पद्धतीने शेती केल्याने अविनाशच्या शेतातील एका झेंडूच्या झाडापासून पाऊण किलोचे उत्पादन मिळत आहे. झेंडूच्या उत्पादना आगोदर अविनाश यांनी आंतरपीक घेतलेल्या काकडीचे ७००किलोचे उत्पादन घेतले. त्यामुळे रँम्पवर गाडी धुण्याप्रमाणे शेती हा व्यवसाय अविनाशसाठी फायदेशीर ठरला आहे.
पत्नीचीही मदत
रँम्पवर गाड्या धुताना शेतीकडे जास्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळे अविनाशची पत्नी त्यांच्या प्रत्येक कामात मदत करते. झेंडूची फुले तोडण्यापासून ते रँम्पवरच्या गाड्यांच्या धुण्याच्या नियोजनापर्यत त्या सर्व काम करतात. मार्केटिंगचे काम अविनाश यांची पत्नी पाहते. त्यामुळे शेती हा जोड धंदा म्हणुन कुटुंबासाठी फायदेशीर असल्याचे अविनाश यांची पत्नी सांगते.
तरुणांसाठी संदेश
कोकणातला तरुण रोजगार नाही म्हणून भटकत मुंबई किंवा पुण्याची वारी करत आहे. पण गावाकडल्या मातीत शेती हा जोडधंदा म्हणुन स्विकारण्याचे धाडस दाखवून अविनाश आज प्रगतशील शेतकरी म्हणून उभा राहिला आहे.